श्रेष्ठा ठाकूर यांची बहारिचमध्ये शनिवारी ट्रान्सफर करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत 11 आमदार आणि खासदारांनी केलेल्या बैठकीच्या आठवड्याभरानंतर हा निर्णय समोर आला. स्थानिक नेत्यांनी 'ती' हुज्जत प्रतिष्ठेचा मुद्दा करत ठाकूर यांच्या वरिष्ठांवर दबाव आणल्याचं म्हटलं जातं.
पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांचा सन्मान राखण्यासाठी श्रेष्ठा ठाकूर यांची बदली आवश्यक होती, असं वक्तव्य भाजपचे शहराध्यक्ष मुकेश भारद्वाज यांनी कुठलीही लाज न बाळगता केलं. मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा ठपका पोलिसांवर ठेवण्यात आला.
काय आहे प्रकरण?
पोलिस मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या गराड्यातही सर्कल ऑफिसर श्रेष्ठा ठाकूर यांनी
आपलं कर्तव्य पार पाडलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
ठाकूर यांनी उत्तर प्रदेशातील भाजपच्या कार्यकर्त्यांची मुजोरी सहन न करता चोख उत्तर दिलं. भाजप नेते प्रमोद लोधी यांच्याकडे गाडीची कागदपत्रं नसल्यामुळे त्यांचं चलान म्हणजेच दंड आकारण्यात आला. याविरोधात भाजप समर्थकांनी गुंडगिरी करत श्रेष्ठा ठाकूर यांना जाब विचारला.
VIDEO: मुजोर भाजप कार्यकर्त्यांना 'मर्दानी' पोलिसाचं प्रत्युत्तर
'तुम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे जा आणि पोलिसांना वाहनं तपासण्याचा कोणताही अधिकार नाही, हे लेखी आणा' असं उत्तर ठाकूर यांनी लोधी यांना दिलं. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाचं नाव बदनाम होतं, अशा शब्दात श्रेष्ठा यांनी खडे बोल सुनावले होते.
'आम्ही पोलिस कर्तव्य बजावण्यासाठी तासन् तास उभे राहतो, हौस म्हणून नाही.' असं म्हणत उपस्थितांची बोलती बंद केली होती.
पाहा व्हिडिओ :