श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील बिगर काश्मिरी विद्यार्थ्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं समोर आलं आहे. या प्रकारानंतर एनआयटीच्या कॅम्पसमध्ये सध्या छावणीचं स्वरुप आहे.
काश्मिर बाहेरील विद्यार्थ्यांनीचं लाठीचार्जचा हा व्हिडिओ फेसबूकवर अपलोड करत, पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे.
टी20 विश्वचषाकाच्या सेमिफायनलमध्ये टीम इंडियाच्या वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवानंतर काही काश्मीरी विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला होता. तसेच त्यावेळी देशविरोधी घोषणाबाजी झाल्याचा आरोप आहे. या घटनेवरुन दोन गटात वाद झाला. यानंतर एनआयटी प्रशासनानं होस्टेल आणि क्लास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा होस्टेल आणि क्लास सुरु करण्यात आले. मात्र काश्मीर बाहेरील विद्यार्थ्यांच्या एक गटानं देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पसबाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज समोर आलं आहे.
आम्ही शांततेने आंदोलन करत होतो, मात्र पोलिसांनीच हिंस्र रुप घेत लाठीमार केल्याचा दावा संबंधित विद्यार्थ्यांनी केला आहे.
दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याप्रकरणी काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी बातचीत केली. मुफ्ती यांनी दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत आहे.