सुषमा स्वराजवर किडनी प्रत्यारोपण करणारे डॉक्टर पद्मचे मानकरी
एबीपी माझा वेब टीम | 26 Jan 2017 03:50 PM (IST)
भुवनेश्वर : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचा केंद्र सरकारतर्फे सन्मान करण्यात आला आहे. ओदिशाचे डॉ. मुकुट मिन्झ पद्मश्रीचे मानकरी ठरले आहेत. चित्रपट अभिनेते साधू मेहेर, लोकगीत गायक जितेंद्र हरिपला, ओडिसी नृत्यांगना अरुणा मोहन्ती आणि डॉ. मुकुट मिन्झ या ओडिसातील चार व्यक्तिमत्त्वांचा पद्मश्रीने गौरव करण्यात आला आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी चौघा मानकरींचं अभिनंदन केलं आहे. डॉ. मुकुट हे मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी विभागाचे एचओडी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची रुग्णसेवा अव्याहतपणे सुरु आहे. सुषमा स्वराज यांच्यावरील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर ते प्रकाशझोतात आले. 'गेल्या तीस वर्षांपासून मेहनत आणि प्रामाणिकपणे मी काम करत आहे. त्यामुळे एखादा मानाचा पुरस्कार प्राप्त होईल, अशी आशा मला होतीच. या सन्मानासाठी मला योग्य समजल्याबद्दल केंद्र सरकार आणि ओदिशा सरकारचे आभार' अशा भावना डॉ. मिंझ यांनी व्यक्त केल्या आहेत.