बेळगाव : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना कोरोनाची लागण झाली आहे. अंगडी यांनी स्वत: याबाबत ट्वीटरवर माहीती दिली आहे. अंगडी यांनी ट्वीट करत म्हटलं की,"मला कोरोनाचा संसर्ग झाला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिनचर्या सुरु आहे.माझी तब्येत उत्तम आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी."
बेळगाव धारवाड रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी काही उद्योजक त्यांच्याकडे गेले होते. काही शेतकरी देखील त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. पक्षाचे कार्यकर्ते देखील त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे अलीकडच्या काही दिवसात सुरेश अंगडी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे टेन्शन वाढले आहे.
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना भाजपच्या मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर उत्तर प्रदेशातील कॅबिनेट मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांचा समावेश आहे. तर यूपीच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री कमला राणी वरुण यांचं कोरोनामुळे निधन झालं.
MARD Protest | कोविड सेवेतील डॉक्टरांना एक दिवस सुट्टी, निर्णयाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन