HD Kumaraswamy Started Nose Bleeding In PC : नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी रविवारी बंगळुरूमध्ये (Bangalore) एक पत्रकार परिषद घेत होते. पण भर पत्रकार परिषदेत अचानक त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागलं. अचानक रक्तस्त्राव सुरू झाल्यानं तात्काळ पत्रकार परिषद थांबवून कुमारस्वामी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या नाकातून अचनाक रक्तस्राव का होऊ लागला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 


केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी रविवारी पत्रकार परिषदेत ,संबोधित करत होते. पत्रकार परिषदेत आपलं मत मांडत असताना त्यांच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरू झाला. अचानक रक्तस्राव सुरू झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जनता दल (सेक्युलर) चे ज्येष्ठ नेते एचडी कुमारस्वामी भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करत असताना त्यांच्या नाकातून रक्त येत असल्याचं लक्षात आलं.




पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री कुमारस्वामी यांनी रक्त पुसण्याचा प्रयत्न केला. पण, काही वेळातच पुन्हा रक्तस्राव सुरू झाला. या अनपेक्षित घडामोडीने तिथे उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल यानं त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


काही वेळानं केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल यांनी माध्यमांना त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, चिंतेचं कोणतंही कारण नाही, त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. निखिल यांनी सांगितलं की, कामाच्या व्यापामुळे वडिलांना अजिबात आराम मिळत नाही. कदाचित त्यांच्या नाकातून रक्त येण्यामागे हेच कारण असू शकतं. 


भाजप-जेडीएस नेत्यांची बैठक 


कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र, कुमारस्वामी आणि कर्नाटकाचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांच्या नेतृत्वाखाली भाजप-जेडीएस नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर विजयेंद्र म्हणाले की, म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) घोटाळ्यासह कर्नाटकातील भ्रष्टाचारामागील कारणांवर चर्चा करण्यासाठी नेत्यांची बैठक झाली. ते म्हणाले की, भाजप आणि जेडीएसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. दोन्ही पक्षांनी 3 ऑगस्टपासून पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतल्याचं भाजप नेत्यानं सांगितलं. बीएस येडियुरप्पा आणि एचडी कुमारस्वामी या यात्रेत सहभागी होतील, ही 7 दिवसांची यात्रा आहे, जी 3 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 10 ऑगस्टला संपेल. 10 ऑगस्टला भाजपचे राष्ट्रीय नेतेही उपस्थित राहणार आहेत. सरकारनं आमचा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही थांबणार नाही, असंदेखील विजयेंद्र यांनी सांगितलं. 


भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र म्हणाले की, काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत, मग तो मुडा घोटाळा असो किंवा एससीपी टीएसपी फंड. आम्ही येत्या शनिवारी बंगळुरू ते म्हैसूर पदयात्रा काढण्याचं ठरवलं आहे. 10 ऑगस्ट रोजी म्हैसूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.