India Digital Transformation: माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव (IT Minister Ashwini Vaishnaw) यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांची अमेरिकास्थित मुख्यालयात भेट घेतली. दोघांनी 'मेक इन इंडिया' (Make in India) कार्यक्रमावर चर्चा केली.


अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी (9 मे) ट्वीट करून त्यांच्या आणि सुंदर पिचाई यांच्यातील भेटीसंदर्भात माहिती दिली. 'इंडिया स्टॅक' आणि 'मेक इन इंडिया' कार्यक्रमांबाबत पिचाई यांच्याशी चर्चा झाल्याचंही अश्विन वैष्णव यांनी ट्वीटमधून सांगितलं.





गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही भेटीसंदर्भात ट्वीट केलं आहे. ट्वीट करत सुंदर पिचाई म्हणाले की, "Googleplex मध्ये मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ काढल्याबद्दल त्यांचे आभार."


दरम्यान, मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई या दोघांची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी जेव्हा पिचाई भारतात आले होते, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अश्विन वैष्णव यांची भेट घेतली होती. गुगल फॉर इंडिया इव्हेंट 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी पिचाई त्यावेळी भारतात आले होते.


2022 मध्ये पंतप्रधान मोदी अन् सुंदर पिचाईंची भेट 


सुंदर पिचाई यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली होती. पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिलं होतं की, "सुंदर पिचाई यांना भेटल्यानंतर आणि नवीन तंत्रज्ञानावर चर्चा केल्यानंतर मला खूप आनंद झाला." पंतप्रधानांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, संपूर्ण जगानं मानवी समृद्धीसाठी आणि शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी एकत्र काम करा. 


यानंतर पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर पिचाई यांनी भेटीबद्दल त्यांचे आभार मानले. पिचाई यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तंत्रज्ञानाचा होत असलेला विकास पाहून त्यांना खूप प्रेरणा मिळते. भारतासोबत स्ट्रॉन्ग पार्टनरशिप सुरू ठेवण्यास मी खूप उत्सुक असल्याचं त्यावेळी पिचाई यांनी ट्वीटमध्ये सांगितलं होतं.