Amit Shah Assam Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) हे आजपासून आसाम दौऱ्यावर आहेत. आजपासून दोन दिवस त्यांचा आसामचा दौरा असणार आहे. रविवारी रात्री उशीरा त्यांचे गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी त्यांचे स्वागत केले. आसाममधील हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त अमित शाह यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहेत.
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. 'माननीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहटी इथं स्वागत करताना सन्मान वाटतो. येत्या दोन दिवसांत गृहमंत्री आसाममधील अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तसेच गृहमंत्र्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभले आहे. तसेच त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनाची अपेक्षा असल्याचेही मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी म्हटले आहे.
हिमंता बिस्वा सरकारचा 10 मे रोजी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण
आसाममधील हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार मंगळवारी म्हणजेच 10 मे रोजी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. आसाममधील हिमंता सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अमित शाह मंगळवारी गुवाहाटीच्या खानापारा मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. यादरम्यान ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेन्सिक सायन्सेससह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांशी करणार चर्चा
आसामच्या दोन दिवसीय दौऱ्यात अमित शाह सार्वजनिक सभागृह, एकात्मिक डीसी कार्यालय, पोलीस आयुक्तालय इमारत आणि गुवाहाटी पोलीस राखीव इमारतीसह विविध प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. दरम्यान आज अमित शाह हे मनकाचार बॉर्डर आउटपोस्ट (BOP) ला भेट देतील. तसेच त्याठिकाणी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहेत.