नवी दिल्ली : अर्थसंकल्प सादर करण्याआधी आतापर्यंत सगळ्यांनी अर्थमंत्र्यांच्या हातात लाल रंगाची ब्रीफकेस घेऊन संसदेत जाताना पाहिलं असेल. संसद भवनात जाण्याआधी अर्थमंत्री आपल्या बजेट कोअर टीमसोबत मंत्रालयाबाहेर फोटोही काढतात. यंदाही देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही आपल्या टीमसोबत फोटा काढला. पण यावेळी त्यांच्या हातात लाल रंगाची ब्रीफकेसऐवजी लाल रंगाचं मखमली पाकिट होतं. निर्मला सीतारमण यांनी आतापर्यंत सुरु असलेली प्रथा पूर्णत: बदलली. याला बजेट नाही तर बहीखाता नाव देण्यात आलं. निर्मला सीतारमण यांनी प्रथा बदलली पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण मंत्रालयाच्या बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्या हातात इतर अर्थमंत्र्यांप्रमाणे लाल रंगाची ब्रीफकेस नव्हती. निर्मला सीतारमण यांच्या हातात ब्रीफकेसच्या जागी अशोक स्तंभाचं चिन्ह असलेलं लाल रंगाचं पॅकेट होतं. बजेट ब्रीफकेसऐवजी लाल कपड्यात ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
'बजेट नाही तर बहीखाता' निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प लाल रंगांच्या कपड्यामध्ये आणण्याचं कारण मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी सांगितलं. ही भारतीय परंपरा आहे. पाश्चिमात्या विचारांच्या गुलामीतून बाहेर आल्याचं प्रतीक आहे. हे बजेट नाही बहीखाता आहे.' स्वातंत्र्यानंतर देशाचा पहिला अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री आर.के. शणमुगम शेट्टी यांनी 26 नोव्हेंबर, 1947 रोजी सादर केला होता. तेव्हा अर्थसंकल्पाचे दस्तऐवज ते लेदर बॅगमध्ये घेऊन आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे संविधानात 'बजेट' शब्दाचा वापरच केलेला नाही. याला वार्षिक आर्थिक विवरण म्हटलं आहे. 'बजेट' शब्दही याच बॅगशी संबंधित आहे. एवढ्या वर्षात या बॅगचा आकार जवळपास सारखाच होता. पण त्याचा रंग मात्र अनेक वेळा बदलला.