नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांनी शुक्रवारपासून आपआपल्या मंत्रीपदाचा पदभार स्वीकारायला सुरुवात केली आहे. याचदरम्यान नव्या सरकारला अडचणीत आणणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातल्या बेरोजगारीने गेल्या 45 वर्षांतला उच्चांक गाठला असल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. देशात बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यावर जाऊन पोहोचला आहे.


2018-19 या आर्थिक वर्षातल्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक विकास दर 5.8 टक्क्यांवर घसरला आहे. त्यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षातली विकास दराची टक्केवारी 6.8 टक्क्यांवर घसरली आहे. नव्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारुन काही तासही लोटले नाही. तोच त्यांना मोठ्या आव्हानांची आठवण करुन देणारी ही आकडेवारी समोर आली आहे.

काही वृत्तपत्रांनी ही आकडेवारी काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. परंतु निवडणुका समोर असल्यामुळे सरकारने ती आकडेवारी मान्य केली नाही. परंतु आता नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर बेरोजगारीची आकडेवारी समोर आली आहे. ज्यामध्ये शहरी भागात 7.8 टक्के बेरोजगार आहेत तर ग्रामीण भागात ही टक्केवारी 5.3 टक्के इतकी बेरोजगारी असल्याचे समोर आले आहे. देशात 6.2 टक्के पुरुष बेरोजगार आहे. तर बेरोजगार महिलांचे प्रमाण 5.3 टक्के इतके आहे.

या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा वृद्धिदरही घसरला आहे. यामध्ये आपण चीनच्या मागे पडलो आहोत. या तिमाहीत चीनचा वृद्धीदर 6.4 टक्के होता, तर भारताचा वृद्धीदर 5.8 टक्के इतका राहिला.