Ram Pran Pratishtha: अयोध्या : तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा फळाला आली अन् अवघ्या देशवासियांच्या मनातील इच्छा पूर्ण झाली. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विधीवत विराजमान झाले. अयोध्येसह (Ayodhya) संपूर्ण देशभरात राम नामाचा जयघोष पाहायला मिळाला. नव भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्व सोहळ्यात पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) हस्ते प्रभू श्रीरामाचा (Shri Ram) विधीवत अभिषेक सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रुप समोर आलं आहे. प्रत्येक देशवासिय प्रभू श्रीरामाचं लोभसवाणं रुप डोळ्यांत साठवत आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा अयोध्येतील सोहळा अनुभवताना प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आहेत. 



विधीवत अभिषेक सोहळा पार पडल्यानंतर प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रुप समोर आलं आहे. प्रभू श्रीराम गर्भगृहात विराजमान झाले असून त्यांची पहिली झलक समोर आली आहे. प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रुप पाहताना नजर हटण्याचं नावच घेत नाहीये. कृष्णशिलेत कोरण्यात आलेलं प्रभू श्रीरामाचं रुप मनाचा ठाव घेऊन जातंय. प्रभू रामचंद्राच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात मोत्यांचा हार आहे. याशिवाय कानातील डूल लक्ष वेधून घेत आहेत. प्रभू रामाच्या हातात सोन्याचं धनुष्य आणि बाण आहे. तसेच, रामलला पिवळा पितांबर नेसवण्यात आलाय. श्रीरामाचं गोजिरं आणि तेजस्वी रुपावरुन नजर हटण्याचं नावच घेत नाही. 






रामललाच्या अभिषेक सोहळ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्भगृहात रामललाची विधीवत पूजा केली आणि त्यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापना पूर्ण झाली. यानंतर पीएम मोदींनी रामललाची आरती केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवतही गर्भगृहात उपस्थित होते.


कृष्णशिलेत साकारलंय श्रीरामाचं तेजस्वी रुप 


अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झालेली प्रभू श्रीरामाची मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी शालिग्राम खडकापासून बनवली आहे. शालिग्राम खडक म्हणजेच, कृष्णशिला. हा काळ्या रंगाचा दगड आहे. धर्मग्रंथ आणि धार्मिक ग्रंथांमध्ये शालिग्राम पाषाण हे भगवान विष्णूचं रूप मानलं गेलं आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार मानले जातात. शालिग्राम खडक हजारो वर्ष जुना आहे. हा खडक पाणी प्रतिरोधक आहे. चंदन आणि रोळी लावल्यानं मूर्तीच्या चकाकीवर परिणाम होत नाही.