नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2021 (UGC NET 2021) जाहीर केली आहे. यूजीसी नेट 2021 परीक्षेची अधिसूचनाही जाहीर केली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यंदा मे महिन्यात होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 2 फेब्रुवारीपासून यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 2 मार्चपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. तर 3 मार्चपर्यंत परीक्षा फी भरण्यासाठी मुदत असणार आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यूजीसी नेट परीक्षांसाठीच्या तारखांची घोषणा केली होती. डिसेंबर 2020 मध्ये होणारी यूजीसी-नेट परीक्षा काही कारणास्तव घेता आली नाही. आता ही परीक्षा 2, 7, 10, 12, 14, आणि 17 मे या दिवशी घेण्यात येणार आहे.
जेआरएफची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने दिलेल्या माहितीनुसार, ही सूट फक्त या वर्षासाठी लागू असणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या नेट परीक्षांसाठी 30 वर्षे वयोमर्यादा राहील, असं यूजीसीनं स्पष्ट केलं आहे.
यूजीसी-नेट/जेआरएफ या परीक्षेसाठी दोन प्रश्नपत्रिका (पेपर) असतील. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात हे पेपर होतील. पहिला पेपरमध्ये जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, टीचिंग आणि जनरल रिसर्च अॅप्टिट्यूट यावर आधारीत प्रश्न विचारण्यात येतील. दुसरा पेपर संबंधित विषयाचा असेल.
सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत पेपर होतील. दोन्ही पेपरसाठी 3 तास वेळ असेल. पेपर सुरू होण्यापूर्वी 1 तास अगोदर उमेदवारांना परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.
महत्वाच्या वेबसाईट
अधिकृत वेबसाईट - https://ugcnet.nta.nic.in/WebInfo/Page/Page?PageId=1&LangId=P
अधिकृत अधिसूचना - https://ugcnet.nta.nic.in/webinfo/File/GetFile?FileId=58&LangId=P