Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने घेतला आहे. मध्यरात्री भारतीन सैन्य दलानं विमानांच्या साहाय्याने क्षेपणास्त्रांचा (Air Strike) मारा करुन पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. हे तळ पूर्णपणे उध्वस्त केले आहे. दरम्यान, यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम, भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये 26 मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करुन सैन्याने बदला घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पाकिस्तानचे भारतातील 'स्लीपर्स सेल' उद्ध्वस्त करुन दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम असल्याचे 'ऑपरेशन सिंदूर'ने ते दाखवून दिले. भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम असे उद्धव ठाकरे म्हणाले.

9 दहशतवादी तळांवर हल्ला

पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) मृत्यूमुखी पडलेल्या 26 पर्यटकांच्या मृत्यूचा बदला भारतानं पाकिस्तानच्या घरात घुसून घेतला आहे. पाकिस्ताननं (Pakistan) आसरा दिलेल्या तब्बल 9 दहशतवादी तळांच्या भारतानं चिंध्या उडवल्या. भारतानं याला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असं नाव दिलंय. पहलगाममध्ये ज्यांचं कुंकू पाकच्या दहशतवाद्यांनी हिरावलं, त्या सर्व महिलांचा बदला आज भारतीय सैन्यानं घेतला. संपूर्ण देशभरात भारतीय सैन्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पण, दुसरीकडे पाकिस्तान मात्र पुरतं भांबावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत युद्धाची तयारी करणाऱ्या पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'नं जोरदार धक्का दिला आहे. फक्त 23 मिनिटांत भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा माज उतरवला. नऊ प्रमुख दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, ही ठिकाणे दहशतवादी कारवायांची केंद्रे मानली जात होती. संरक्षण मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अचूक आणि संयमी प्रतिसाद म्हणून वर्णन केले. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचे दोन टॉप दहशतवादीही मारले गेले आहेत.

काय म्हणाले राज ठाकरे?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेले नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील, असा धडा शिकवणे गरजेचे होते. अशावेळी पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत. पाकिस्तान हा अगोदरच बर्बाद झालेला देश आहे. त्यांना आणखी काय बर्बाद करणार? अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर पाडले आणि पँटागॉनवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेन त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणे योग्य गोष्ट नाही, असे परखड मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Raj Thackeray on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर नंतर कौतुक सोडाच पण राज ठाकरेंनी मोदींच्या कारभाराचे वाभाडे काढले, म्हणाले, युद्ध अन् एअर स्ट्राईक उत्तर नव्हे