भोपाळ : आज व्हॅलेन्टाईन्स डे, अर्थात प्रेमाचा दिवस. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. जोडप्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोघे एकत्र येतात, प्रेम व्यक्त करतात, आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतात. पण व्हॅलेन्टाईन्स डेलाच मध्य प्रदेशातील 136 जोडपी ब्रेकअपची वाट पाहत आहेत.


व्हॅलेन्टाईन्स डेला भोपाळमधील ही 136 जोडपी एकमेकांना भेटतील, पण प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा आयुष्यभर सोबत राहण्यासाठी नाही तर एकमेकांपासून वेगळं होण्यासाठी. भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात या 136 जोडप्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरु आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या सुनावणीची तारीख 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेटाईन्स डे निश्चित करण्यात आली आहे.

भोपाळमध्ये तीन कौटुंबिक न्यायालयं आहेत. मुख्य आणि दोन अतिरिक्त न्यायालय. मुख्य कोर्टातील एकूण प्रकरणांपैकी 32 घटस्फोटांची सुनावणी 14 फेब्रुवारीला आहे. तर पहिल्या अतिरिक्त कोर्टात 63 आणि दुसऱ्या कोर्टात 31 खटल्यांवर आजच सुनावणी होणार आहे. कौटुंबिक न्यायालयं घटस्फोटाची प्रकरणं पहिल्यांदा काऊन्सलिंगसाठी पाठवतात, जेणेकरुन बातचीत करुन हे प्रकरण मिटवता येऊ शकेल.

"परस्पर सहमतीने जोडप्यांचा वाद सुटावा, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. दोघे आनंदी राहावेत यासाठी मतभेदही दूर केले जातात. पण ते अडून राहिले तर प्रकरण घटस्फोटासाठी पाठवलं जातं," असं कौटुंबिक न्यायालयाचे काऊन्सलर नूरुंनिसा यांनी सांगितलं.