Udaipur Violence: उदयपूर : राजस्थानच्या उदयपूरमध्ये शाळकरी मुलांच्या भांडणावरून मोठा हिंसाचार झाला. दोन धर्मांच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला, त्यातून एकानं दुसऱ्यावर चाकूहल्ला केला. यामध्ये पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केल्यावर निदर्शनं सुरू झाली. काही वेळातच ही निदर्शनं हिंसक झाली, ज्यामध्ये एका मॉलची तोडफोड करण्यात आली, तसंच एका गॅरेजमधील वाहनांना आग लावण्यात आली. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पण, या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उदयपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं असून इंटरनेटही बंद ठेवण्यात आलं आहे. 


उदयपूरमधील (Rajasthan Udaipur) घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर त्याच शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यानं चाकूनं हल्ला केला. या घटनेनंतर शहरातील वातावरण बिघडलं असून अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडू लागल्या. बदमाशांनी अनेक गाड्या पेटवून दिल्या. परिस्थिती पाहता पोलिसांनी कलम 144 लागू केलं असून शनिवारी रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत सर्व (खाजगी आणि सरकारी) शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं जारी केले आहेत.


सूचना न पाळणाऱ्यांवर कारवाई 


शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याच्या आदेशात असं म्हटलं आहे की, 'सर्व सरकारी/निमसरकारी शाळांमध्ये इयत्ता 1 ते 12 पर्यंत आणि सर्व सरकारी/निमसरकारी महाविद्यालयांमध्ये 17.08.2024 पासून पुढील आदेशापर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.' सूचना न पाळणाऱ्या शाळा/महाविद्यालयांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असं आदेशात म्हटलं आहे.


जखमी विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक


शहरातील सूरजपोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भट्टियानी चौहट्टा येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांचं पथक त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. या घटनेनंतर उदयपूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी घटनास्थळी पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, दोन विद्यार्थ्यांमध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं. जाहिरात जुन्या वैमनस्यातून यानंतर एका विशिष्ट समाजाच्या विद्यार्थ्यानं दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूनं हल्ला करून जखमी केलं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जखमी मुलगा ज्या समाजाचा होता, त्या समाजाचे लोक मोठ्या संख्येनं जमा झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.


मारामारीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रुग्णालयात मोठ्या संख्येनं लोक जमले असून आरोपी मुलावर कठोर कारवाईची मागणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, दोघांमध्ये जुनं वैमनस्य असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. अनेक ठिकाणी वाहनं जाळण्यात आली आहेत. उदयपूरमधील अनेक भागांत तणाव निर्माण झाला असून जाळपोळ करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचीही माहिती समोर आली आहे.