Udaipur Tailor Murder Case : राजस्थानमधील उदयपूरमध्ये टेलर कन्हैया लालची हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर उदयपूरसह संपूर्ण राजस्थानमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या हत्येतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरुन विविध पक्षांचे राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ओवेसी यांनी घटनेचा निषेध केला आहे. उदयपूरची घटना हे राजस्थान पोलिसांचे अपयश असल्याचा आरोप ओवेसी यांवनी केला आहे.


नेमकं काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी


कन्हैया लालची हत्या रोखता आली असती. तो पहिल्यापासून याबाबत तक्रार करत होता. ही निर्घृण हत्या आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करत असल्याचे ओवेसी यांनी म्हटलं आहे. देशात धर्मांधता किती वाढत चालली आहे, हे तयार करण्यात आलेल्या व्हिडिओवरून स्पष्ट होत असल्याचे ओवेसी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नूपुर शर्माला अटक करुन न्यायालयाच्या कलमांखाली शिक्षा व्हावी असेही ते म्हणाले. नुपूर शर्माला भारताच्या कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. सरकार नुपूर शर्मा यांना संरक्षण देत असल्याचा आरोपही ओवेसी यांनी केला. देशातील कट्टरतावाद थांबवण्यासाठी सरकारनं सर्वांसाठी समान कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.


राजस्थानचे पोलीस सावध राहिले असते तर....


कायदा हातात घेऊन कुणालाही मारण्याचा अधिकार नाही, असे ओवेसी म्हणाले. मला आशा आहे की राजस्थान सरकार यावर कठोर कारवाई करेल आणि आरोपींना कठोर शिक्षा देईल. माझा विश्वास आहे की जर राजस्थानचे पोलीस थोडे सावध राहिले असते तर ही घटना घडली नसती. कारण आज मला कळले की कन्हैया लालला यापूर्वी अटक करण्यात आली होती. तो जामिनावर बाहेर आला होता. त्याला धमक्या येत होत्या, तरीही पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे ओवेसी म्हणाले.


मुख्यमंत्र्यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक


दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कन्हैया लालच्या हत्येनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक दिनेश एम.एन म्हणाले की, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरु आहे. आता शवविच्छेदन सुरु असून काही वेळात अंत्यसंस्कार केले जातील. ते शांततेत होईल अशी आशा आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संवेदनशील तसेच धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येत आहे.