लखनौ : उत्तर प्रदेशच्या लखनौमधून दोन दहशतवाद्यांच्या एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही दहशतवादी अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दोघे पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते. घटनास्थळी एटीएसकडून शोध मोहीम सुरु आहे. या व्यतिरिक्त स्थानिक पोलिसही या कारवाईत सामील झाले आहेत. जवळपासची घरे रिकामी केली गेली आहेत. बॉम्ब पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, लखनौमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दहशतवादी असलेल्या घरात स्फोटके असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईसाठी एनएसजी कमांडोनाही बोलवण्यात आले आहे. दरम्यान, या दोन्ही संशयित दहशतवाद्यांचे हँडलर अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर असल्याची माहिती मिळाली आहे. उमर-अल-बांदी त्यांना सूचना देत होते. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भाजपचे अनेक नेते असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
यूपीचे भाजपचे सर्वोच्च नेतृत्व दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
एबीपी गंगाला मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक भाजप नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. त्यापैकी उत्तर प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, संघटन सरचिटणीस सुनील बंसल हे देखील निशाण्यावर होते.
मिळालेल्या माहितीनुसार हे घर ठाकूरगंज भागात आहे. हे अतिशय दाट लोकवस्तीचा हा परिसर आहे. कोणत्याही सर्वसामान्यांना इजा होणार नाही याची दक्षता एटीएस घेत आहे. या कारवाईसाठी घटनास्थळी एक रुग्णवाहिकाही बोलवण्यात आली आहे. आतापर्यंत अशी माहिती मिळाली आहे की हे घर मलिहाबाद येथील रहिवासी असलेल्या शाहिद नावाच्या व्यक्तीचे आहे, जेथे तो आपल्या कुटुंबासमवेत राहतो. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. एडीजी प्रशांत कुमारही घटनास्थळी आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही प्रत्येक क्षणाची माहिती घेत आहेत.