आग्रा : आग्र्यामध्ये दोन ठिकाणी स्फोट झाला आहे. कँट रेल्वे स्टेशनजवळ एक आणि दुसरा स्फोट एका घराजवळ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटामध्ये कुणीही जखमी झालं नसून बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


विशेष म्हणजे आयसिस या दहशतवादी संघटनेने कालच एका पोस्टरद्वारे ताजमहल उडवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काही तासात हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे.

आयसिसकडून ताजमहल उडवण्याची धमकी

इंटरनेटवर लिंक तयार करुन ती प्रसिद्ध करण्यात आली होती. ती आयसिसची धमकी असल्याचं सांगितलं जात आहे. तरीही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून ताजमहलसह आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, असं अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत चौधरी यांनी सांगितलं होतं.

‘ताज महोत्सव’ या वार्षिक कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर ही धमकी देण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आयसिसने एक फोटो प्रसिद्ध करुन ताज महल आपला पुढील निशाणा असल्याची धमकी दिली आहे.

दरम्यान आयसिसच्या या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आग्र्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत चौधरी यांनी सांगितलं.

संबंधित बातमी : आयसिसकडून ताजमहल उडवण्याची धमकी, सुरक्षा व्यवस्थेत वाढ