पोलीस आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरु आहे. इमारतींच्या ढिगाऱ्याखालून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
दोन इमारतींपैकी एका इमारतीत 10 ते 12 कुटुंब राहत होती. चार मजली इमारत जीर्ण झाली होती, तर दुसऱ्या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. मंगळवारी रात्री परिसरात मोठा आवाज झाला. परिसरातील घाबरलेल्या लोकांनी भूकंप झाल्याचं समजून घराबाहेर पळ काढला. त्यावेळी दोन इमारती कोसळल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र इमारती कोसळण्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
घटनेची माहिती मिळताच गाझियाबाद पोलीस, नोएडा पोलीस आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं. श्वान पथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री महेश शर्मा घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.