Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) जिल्ह्यातील सिलक्यारामधील निर्माणाधीन बोगद्यात (Tunnel Accident) मागील 16 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहे. मजुरांच्या सुटकेसाठी 80 मीटर व्यास असलेल्या 10 मीटर पाईप टाकण्याचे काम मागील चार दिवसांपासून थांबले आहे. ड्रिल करणारी ऑगर मशीन तुटली असल्याने तिकडेच अडकली आहे. फक्त 48 मीटरपर्यंत ड्रिलिंग झाले आहे.
त्यावर पर्याय म्हणून लष्कराचे जवान टेकडीच्या माथ्यावरून उभ्या ड्रिलिंग करत असून, ते 30 मीटरपर्यंत करण्यात आले आहे. मात्र तेथेही पाणी आल्याने काम थांबले आहे. अवजड मशिन्स निकामी झाल्यानंतर आता 41 मजुरांना वाचवण्यासाठी रॅट मायनिंग करणाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.
उंदरांसारखे खणणार बोगद्यातील अडथळे
रॅट मायनिंग म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यांच्या नावातील उंदीर या शब्दावरून हे समजू शकते की उंदरांप्रमाणेच, एका छोट्या जागेत वेगाने खोदणारी तज्ज्ञांची एक टीम आहे. या टीमवर आता 41 कामगारांची सुटका अवलंबून आहे. हे लोक हाताने 48 मीटरच्या पुढे खोदकाम करतील. यासाठी त्यांच्याकडे हातोडा, फावडा आणि इतर पारंपारिक खोदकामाची साधने आहेत. दिल्ली आणि अहमदाबादमध्ये या प्रकारच्या कामाचा अनुभव असलेल्या 6 खाण कामगारांची टीम येथे पोहोचली आहे.
दोन-दोन खाण कामगारांवर जबाबदारी
रॅट मायनिंग कामगारांनी सांगितले की, पहिल्यांदा दोन लोक पाइपलाइनमध्ये जातील, एक पुढे मार्ग तयार करेल आणि दुसरा राडरोडा एका ट्रॉलीमध्ये लोड करेल. बाहेर उभे असलेले चार लोक दोरीच्या साहाय्याने या राडारोड्याची ट्रॉली पाईपच्या आतून बाहेर काढतील. एका वेळी 6 ते 7 किलो राडरोडा बाहेर काढला जाईल. खोदकाम करण्यासाठी आत गेलेले लोक थकले की बाहेरून दोन लोक आत जातील आणि आधीचे दोघेही बाहेर येतील. तसेच उर्वरित 10 मीटरसाठी एक एक करून खोदकाम केले जाणार आहे. "आत अडकलेली माणसंही कामगार आहेत आणि आम्हीही कामगार आहोत. त्यांना वाचवलं, तर उद्या कुठेतरी अडकलो तर हेच लोक आम्हाला वाचवतील," अशी आशा या कामगारांनी व्यक्त केली.
लहान जागी खोदकाम करण्याचा अनुभव
रॅट मायनिंग कामगार हे लहान जागेत खोदकाम करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. ज्या ठिकामी मशीनचे काम शक्य नाही तेथे हे कामगार उपयुक्त आहे. साधारणपणे या तंत्राचा वापर बेकायदेशीर कोळसा खाणकामासाठी केला जातो. मशिन आणि इतर उपकरणांची उपस्थिती लोकांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेऊ शकते. प्रशासनाला रॅट मायनिंगबाबत कोणताही सुगावा लागत नाही. याशिवाय, ही एक अतिशय वेगवान प्रक्रिया आहे आणि तिचे यश अपेक्षित आहे. त्यामुळे उत्तराखंडच्या बोगद्यातही हे तंत्र आशेचा किरण बनले आहे.