व्हायरल सत्य : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या 'या' फोटोमागचं सत्य काय?
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2017 09:00 PM (IST)
ज्या बाईकस्वारासमोर पोलिस अधिकारी शलभ कुमारांनी हात जोडले आहेत, त्याचं नाव हनुमंत नायडू आहे.
मुंबई : आंध्र प्रदेशातील एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत बाईकवर एक व्यक्ती दोन महिला आणि दोन मुलांसोबत बसली आहे. तर समोर एक पोलिस अधिकारी या बाईकस्वारासमोर हात जोडून उभा आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील ही घटना आहे. या फोटोतील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, बाईकवर बसलेल्या कुणीच हेल्मेट घातले नाही. कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी अभिषेक गोयल यांनी हा फोटो ट्विटरवर पोस्ट करत लिहिले आहे की, "बाईकस्वारासमोर हात जोडण्यापलिकडे पोलिस अधिकारी काय करु शकतो?" अभिषेक गोयल यांचं हे ट्वीट 7 हजारांहून अधिक जणांनी लाईक आणि 4 हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. बाईकस्वारासमोर हात जोडून असणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्याचं नाव शलभ कुमार असल्याची माहिती मिळते आहे. शलभ कुमार हे अनंतपूरच्या मडाकसारियामध्ये पोलिस अधिकारी आहेत. आणखी विशेष म्हणजे, या घटनेआधी काही तास रोड सेफ्टीसंदर्भात एक कार्यक्रम पोलिस अधिकारी शलभ कुमार यांनी केला होती. त्या कार्यक्रमात हे कुटुंबही हजर होते. ज्या बाईकस्वारासमोर पोलिस अधिकारी शलभ कुमारांनी हात जोडले आहेत, त्याचं नाव हनुमंत नायडू आहे. शलभ कुमार यासंदर्भात बोलताना म्हणाले, "जेव्हा मी बाईकवर पाच जण बसल्याचे पाहिले, त्यावेळी मला प्रचंड राग आला. मात्र मी हतबल झालो आणि त्यांच्यासमोर केवळ हात जोडले. कारण मी तेच करु शकत होतो." पोलिस अधिकारी शलभ कुमार यांनी बाईकस्वार हनुमंत नायडू यांच्यासमोर हात जोडले. त्यावेळी हनुमंत नायडू हे हसत होते. https://twitter.com/goyal_abhei/status/917563520639655936