नवी दिल्ली: सिंघु बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये कित्येक किलोमीटर पर्यंत ट्रक्टरच्या हजारो ट्रॉल्यांची रांग दिसते. टिकरी बॉर्डरवरही हीच परिस्थिती आहे. शेतकरी आंदोलनातील नेत्यांची मतं आता या हजारो ट्रॉल्यांपर्यंत पोहचण्यासाठी 'ट्रॉली टाइम्स' या वृत्तपत्राची सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी त्याचा पहिला अंक प्रकाशीत झाला.
प्रत्येक ट्रॉलीपर्यंत आंदोलनाचा उद्देश पोहचला पाहिजे तसेच अशा प्रकारचं वृत्तपत्र सुरु करण्याची कल्पनाही एका ट्रॉलीमध्येच सूचल्यानं या वृत्तपत्राचं नाव 'ट्रॉली टाइम्स' असं ठेवण्यात आलंय. सध्या हे वृत्तपत्र आठवड्यातून दोनदा प्रकाशीत करण्यात येणार आहे.
'जुडेंगे, लडेंगे, जीतेंगे'
या वृत्तपत्रकांच्या लीड स्टोरीचे शिर्षक आहे 'जुडेंगे, लडेंगे, जीतेंगे'. चार पानांचे हे वृत्तपत्र हिंदी आणि पंजाबी भाषेतून प्रकाशीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वृत्तपत्रात कविता आणि कार्टून्सना देखील स्थान देण्यात आलंय. 'ट्रॉली टाइम्स' या वृत्तपत्राची सुरुवात करण्याची कल्पना सुरमीत मावी यांची आहे. सुरमीत मावी हे व्यवसायाने कथाकार आहेत आणि चित्रपटांसाठी स्क्रिप्टही लिहतात. त्यांनी सांगितलं की, "वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आज देशातील लोकशाही धोक्यात येत असताना हे वृत्तपत्र क्रांती करेल. या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्याशी जोडणार आहोत, आणि एकत्रित लढणार आहोत."
शेतकऱ्यांचा आवाज बनणार
शेतकरी आंदोलनाच्या बातम्या करताना काही माध्यमांकडून जाणीवपुर्वक देशातील नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे असा आरोप शेतकरी आंदोलकांच्या नेत्यांकडून वारंवार होत आहे. अशावेळी या आंदोलनाची सत्य परिस्थिती काय आहे, पुढचं धोरण काय आहे याची माहिती शेतकरी आणि नागरिकांना देणं गरजेचं असल्याचं या वृत्तपत्राच्या टीमकडून सांगण्यात येतंय. हे वृत्तपत्र या शेतकरी आंदोलनाचा आवाज बनेल अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.
या वृत्तपत्राच्या पहिल्या अकांच्या 20 हजार प्रती छापण्यात आल्या आहेत. याचं नियोजन करण्यासाठी 20 लोकांची एक टीम तयार करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: