नवी दिल्ली : ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर आता सुप्रीम कोर्टाचं संविधान पीठ सुनावणी करणार आहे. 11 मे पासून ट्रिपल तलावर विस्तृत सुनावणी करण्यात येणार आहे. मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे पाठवलं आहे.
काही वरिष्ठ वकिलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत सुनावणीवर आक्षेप घेतला. त्यावर मुख्य न्यायाधीशांनी फटकारत, 'मी आणि इतर न्यायाधीश काम करण्यास तयार आहोत. मात्र आपल्याला काम करायचं नसेल तर आम्हीही सुट्टीवर जाणार' असं ठणकावलं. त्यानंतर इतर वकिलांकडून 11 मे च्या सुनावणीवर एकमत झालं.
दरम्यान कुठलाही पर्सनल लॉ संविधानापेक्षा मोठा नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. याआधी सुप्रीम कोर्टानंही असंच वक्तव्य करत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मुस्लिम महिलांच्या अधिकारांवर जाच आणत नाही ना? असा सवाल केला होता.