नवी दिल्ली : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण केल्याच्या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. त्यानंतर गायकवाड आडनावाच्या आणखी एका खासदाराला 'एअर इंडिया'चा विचित्र अनुभव आला आहे. शाहरुख खानच्या 'माय नेम इज खान' चित्रपटासारखा अनुभव आता महाराष्ट्रातल्या अन्य गायकवाडांनाही येऊ लागला आहे.
सुनील गायकवाड हे लातूरमधून भाजपचे खासदार आहेत. गायकवाड या आडनावाशी असलेल्या साधर्म्यामुळे खासदार सुनील गायकवाड यांना एअर इंडियाचा वेगळा अनुभव आल्याचं म्हटलं जातं. गेल्या दोन प्रवासात त्यांचं तिकीट लवकर बुक झालं नाही. शिवाय त्यांची नेहमीपेक्षा जास्त कसून चौकशीही झाल्याचा दावा, सुनील गायकवाडांनी केला आहे.
'नेहमी माझा पीए एक मिनिटात तिकीट बुक करायचा, मात्र रवींद्र गायकवाड यांनी चपलेनं मारहाण केल्याचं प्रकरण झाल्यानंतर एअर इंडियाकडून बरीच चौकशी झाली. सुनील गायकवाड हे पूर्ण नाव सांगूनही ते कुठले खासदार आहेत, त्यांचा नंबर द्या, तुम्ही कोण बोलताय, तुमचा नंबर द्या' अशा प्रकारे दहा मिनिटं पीएवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचं सुनील गायकवाड म्हणाले.
सेंट्रल हॉलमध्ये ही अनेक खासदार गायकवाड या नावामुळे त्यांना विचारत आहेत. केवळ आडनावाशी साधर्म्य असल्यामुळे सर्वच गायकवाडांकडे संशयाच्या दृष्टीने पाहणं चुकीचं असल्याचं मत सुनील गायकवाड यांनी व्यक्त केलं.