फिरोजपूर : प्रत्येकजण स्वत:साठी जगतो, पण दुसऱ्यासाठी स्वत:च्या जीवाचं बलिदान देणारे क्वचितच असतात. अशीच काहीशी घटना पंजाबमध्ये घडली आहे. प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी एका मोटरमनने स्वत: चं बलिदान दिल्याची घटना रविवारी पंजाबमधील फिरोजपूरमध्ये घडली.


वास्तविक, रविवारी सकाळी 8.40 वाजता पंजाबमधील फिरोजपूरमधून 7491 DMU पॅसेंजर ट्रेन फिरोजपूरहुन फाजिल्काला निघाली. जलालाबाद रेल्वे स्टेशनवरुन जात असातना, बहामनी वॉलच्या गेट नंबर 3064 जवळ या ट्रेनला एक भरधाव ट्रक येऊन धडकली.  ट्रक इतका भरधाव वेगात होता की, ट्रेनमुळे ट्रकसह ट्रेनच्या इंजिनाच्याही चिंधड्या झाल्या.

पण हा ट्रक भरधाव वेगात येत असल्याचं पाहिलं, ट्रेनचा मोटरमन विकास कुमारने ट्रेनचा इमरजन्सी ब्रेक दाबला. उत्तर रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलेल्या अधिक माहितीनुसार, विकासने मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा ब्रेक दाबला होता, त्यामुळे हजारो प्रवाशांचे जीव वाचले.

जर त्यानं मनात आणलं असतं, तर तो ट्रेनमधून उडी घेऊन स्वत:चा जीव वाचवू शकला असता. पण त्याने स्वत:च्यापेक्षा प्रवाशांच्या जीवाला प्राथमिकता दिली. त्यांनं स्वत:चं बलिदान देऊन हजारो प्रवाशांचा जीव वाचवला.

या अपघातातून सर्व प्रवासी सुखरुप बचावले. तर ट्रकच्या चालकाने ट्रकमधून उडी घेऊन पळ काढला.

दरम्यान, उत्तर रेल्वेचे प्रवक्ते निरज शर्मा यांनी ट्रेन ड्रायव्हरच्या धाडसाचं कौतुक केलं. तसेच या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश रेल्वे विभागाला देण्यात आल्याचं सांगितलं.