German Chancellor Olaf Scholz : जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ (Olaf Scholz) बंगळुरु (Bangalore) दौऱ्यावर आहेत. यानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्या आजच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम जारी केला आहे. त्यानुसार रविवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहन चालकांना वेग मर्यादेचे ही पालन करावे लागणार आहे. 14-18 किमी प्रतितास ते 20-22 किमी प्रतितास इतका वेग वाहन चालकांना ठेवावा लागणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.
ओलाफ स्कोल्झ यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल
जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ बंगळुरु दौऱ्यावर दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौरा करून आज ते बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत. स्कोल्झ यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि एक उच्च अधिकार असलेले व्यावसायिक शिष्टमंडळ देखील भारत दौऱ्यावर आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती देण्यात आली आहे. यानुसार 2011 मध्ये दोन्ही देशांदरम्यान आंतर-सरकारी सल्लामसलत (IGC) यंत्रणा सुरू झाल्यापासून त्यांची भारत भेट ही जर्मन चान्सलरची पहिली स्वतंत्र भेट आहे.
'या' पर्यायी मार्गांचा करा वापर
दरम्यान, या काळात वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्याय मार्गाचा वापर करण्यास सांगितलं आहे. यानुसार, बल्लारी रोड, मेहकी सर्कल, कावेरी थिएटर जंक्शन, रामना महर्षी रोड, इन्फंट्री रोड, कब्बन रोड, हाल ओल्ड एअरपोर्ट रोड यासह व्हाईटफिल्ड मेन रोड, रिंगरोड या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना परवानगी नसेल. ट्रॅफिक अॅडव्हायझरीमध्ये सांगण्यात आलं आहे की, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी स्कोल्झ यांची घेतली भेट
जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ शनिवारपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. आज स्कोल्झ बेंगळुरू दौऱ्यावर आहेत. शनिवारी ओलाफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार कराराच्या (FTA) महत्त्वावर भर देत त्यांनी शनिवारी सांगितले की, ते त्याच्या लवकर अंमलबजावणीवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :