नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्षात निवडणूक चिन्हावरुन सध्या 'यादवी' माजली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोग आज आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांच्या नेतृत्त्वात आयोगाने शुक्रवारी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं होतं आणि आपला आदेश राखून ठेवला होता. त्यामुळे निवडणूक आयोग आज आपला आदेश जाहीर करण्याची शक्यता आहे.
नियमांनुसार निवडणूक आयोगाला जेव्हा कधी अशाप्रकारचा निर्णय घ्यावयाचा असतो, त्यावेळी संपूर्ण आयोगाची बैठक बोलवावी लागते, त्यानंतरच निर्णय घेतला जातो. ही बैठक साधारणत: मंगळवारी आणि शुक्रवारी होते. मात्र, आतापर्यंत अशी कुठेही माहिती मिळाली नाही की, बैठक आज (सोमवारी) आयोजित केलेली आहे. मात्र, निवडणूक आयोग आज संपू्ण आयोगाची बैठक बोलावून निर्णयाची जाहीर करण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची सुरुवात 17 जानेवारीपासून होणार आहे. उत्तर प्रदेशात एकूण 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.
समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी 1 जानेवारीला बोलावलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात आले. त्यानंतर आधीपासूनच समाजवादी पक्षात सुरु असलेल्या वादाला मोठं वळण मिळालं.
याच अधिवेशनात मुलायसिंह यादव यांना पक्षाच्या मार्गदर्शकपदी नियुक्त करण्यात आले. त्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी या सर्व निर्णयांचा विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला. आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून 'सायकल' हे निवडणूक चिन्हही आपल्याजवळच राहायला हवं, असा दावा त्यांनी केला आहे.
आता उत्तर प्रदेशातील निवडणुकीत 'सायकल'सवारी करत प्रचार कोण करणार, हे निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच अवलंबून आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे उत्तर प्रदेशातील जनतेसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.