नवी दिल्ली : मोदी सरकारने नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर 500 आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात आणल्या. मात्र, यातील अनेक त्रुटी आता समोर येत आहेत. यातीलच एक म्हणजे, अंध व्यक्ती या नव्या नोटांना स्पर्श करुन त्या ओळखण्यास असमर्थ ठरत असल्याचं, राष्ट्रीय दृष्टिबाधित संघटना (NAB) नं स्पष्ट केलं आहे.

संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे की, 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांवरील अंकांची छपाई योग्य पद्धतीने झाली नाही. त्यामुळे अंध व्यक्तींना त्या ओळखणे अवघड झाले आहे.

एनएबीचे राष्ट्रीय सचिव जोकिम रापोसे म्हणाले की, ‘नोव्हेंबरमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या चलनातून रद्द केल्यानंतर, नव्या नोटांवरील अंकांची छपाई योग्य पद्धतीनं व्हावी, असं मी केंद्र सरकारला सूचित केलं होतं. त्यावेळी त्यांच्या या सूचनेवर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं अश्वासन दिलं होतं. पण अद्याप आमच्या समस्येचं निराकरण झालं नाही.’

दृष्टिबाधितांच्या राज्य विकास आणि वित्त प्राधिकरणाच्या मते, महाराष्ट्रात सर्वाधिक 5.47 लाख व्यक्ती अंध आहेत. तर सरकारी आकडेवारीनुसार, देशात जवळपास 80 लाख व्यक्ती दृष्टिबाधित आहेत. पण नव्या नोटांची छपाई करताना अंध व्यक्तींसाठी कोणताही विचार करण्यात आला नसल्याचं, रापोसे यांनी सांगितलं.

दरम्यान, 10,20,50 आणि 100 रुपयांच्या नोटांवर ब्लीड लाईन्स आणि आयडेंटिफिकेशन मार्कची छपाई योग्य पद्धतीनं झाल्याने अंध व्यक्तींना हताळण्यात कसलीही अडचण येत नाही. पण 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांवरील छपाईचे हे निकष पाळले गेले नसल्याने नव्या नोटा हताळण्यास अंध व्यक्ती असमर्थ ठरत आहेत.