नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्त आज दिल्ली आणि दिल्लीच्या सीमांना जोडणाऱ्या केएमपी एक्स्प्रेस मार्गावर 5 तासांची नाकाबंदी केली जाणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत शेतकरी केएमपी एक्स्प्रेस वे जाम करतील. त्याचबरोबर शेतकरी टोल देखील भरण्यास मनाई करतील. मात्र शेतकऱ्यांच्या मते ते पूर्ण शांततेत आंदोलन करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाने आवाहन केलं आहे की 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आंदोलकांनी काळी पट्टी बांधून निषेध नोंदवावा.


सिंघू सीमेवरुन शेतकरी कुंडली येथे जाऊन एक्स्प्रेस वे अडवणार आहेत. या मार्गावरील टोल प्लाझा देखील शेतकरी अडवणार आहेत. गाझीपूर सीमेवरुन शेतकरी डासना टोलकडे जातील. टिकरी सीमेजवळील बहादूरगडची सीमा देखील शेतकरी आंदोलक जाम करणार आहेत. तसेच शहाजहानपूर सीमेवर बसलेले शेतकरी आंदोलक गुरुग्राम-मानेसरहून जाणारा केएमपी एक्स्प्रेस वे जाम करणार आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने असंही सांगण्यात आलं आहे की ज्या सीमांवर टोल नाके जवळ असतील त्या देखील ब्लॉक केल्या जातील.


Farmer Protest : ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण, जाणून घ्या आंदोलनातील महत्वाचे टप्पे


शेतकरी सर्व टोल नाके जाम करतील


गाझीपूर सीमेवर बसलेल्या भारतीय किसान युनियनचे उत्तर प्रदेश अध्यक्ष राजवीरसिंह जादौन यांनी सांगितले की, शेतकरी येथून डासना टोलपर्यंत प्रवास करतील. परंतु हरियाणा-यूपीमधील सर्व टोल दुहाई, कासना, नोएडा इत्यादी ठिकाणी शेतकरी आंदोलक उपस्थित असतील आणि ते रस्ता जाम करतील. हे आंदोलन शांततेत पार पडणार असून प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. आंदोलनकर्ते प्रवाशांना शेती विषयक होणाऱ्या त्रासाबद्दल माहितीही देतील.


Farmer Protest : आता महिला शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणार, योगेंद्र यादवांची माहिती


आपत्कालीन वाहने थांबवले जाणार नाहीत


राजवीर सिंह पुढे म्हणाले की, आपत्कालीन वाहने थांबवण्यात येणार नाहीत. रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा कोणत्याही परदेशी पर्यटकांना रोखले जाणार नाही. तसेच सैन्याची वाहनेही थांबवली जाणार नाहीत. संयुक्त किसान मोर्चानेही सर्वसामान्यांना विनंती केली आहे की या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी घरे आणि कार्यालये येथे काळे झेंडे लावावेत.