मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये तिरंगा यात्रेसाठी गेलेल्या जावडेकर यांनी, पंडित नेहरु आणि सरदार पटेल यांचा शहीद असा उल्लेख केला. इतकंच नाही तर नेहरु, पटेल हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर लटकले असा उल्लेख जावडेकरांनी आपल्या भाषणात केला.
तिरंगा यात्रेदरम्यान जावडेकरांनी त्यांच्या भाषणात भगतसिंह, राजगुरुंसह अनेक राष्ट्रपुरुषांची नावं घेतली. मात्र या यादीत त्यांनी नेहरु, पटेलांचीही नावं घेतल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या. याच भाषणात जावडेकरांनी सुभाषचंद्र बोस यांनाही शहीद संबोधलं.
एकीकडे सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबत अजूनही सरकारकडून चर्चेच्या फैरी झडत आहेत. नेताजींचा मृत्यू झाला की नाही हेच अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र जावडेकरांनी त्यांना शहिद संबोधलं आहे.
काय म्हणाले जावडेकर?
ब्रिटीशांना हाकलून ज्यांनी भारत स्वातंत्र्य केला, त्या सर्वांना आम्ही सलाम करतो. अनेक वीर यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरु, भगतसिंह, राजगुरु हे सर्व फासावर लटकले. क्रांतीवीर सावरकरांसह अन्य महान स्वातंत्र्य सेनानींनी देशासाठी अनेक लाठ्या खाल्या, गोळ्या झेलल्या, अनेक जण जेलमध्ये गेले, फासावर लटकले.