नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत 'मॉब लिंचिंग'ची घटना घडली आहे. दिल्लीच्या उत्तर नगरमध्ये बॅटरी चोरी केल्याच्या संशयातून जमावाने तीन जणांना बेदम मारहाण केली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अविनाश सक्सेना असे मृत तरुणाचे नाव असून तो ऑटो रिक्षा चालवत होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.


दोन प्रवाशांना घेऊन अविनाश हा रिक्षाचालक शनिवारी सकाळी दिल्लीतल्या मोहन गार्डन परिसरात काही साहित्य खरेदी करण्यासाठी गेला होता. अविनाश रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबवून लघुशंकेसाठी गेला होता. परत आल्यावर त्याने पाहिले की, त्याच्या गाडीतील प्रवासी काही बॅटरीज घेऊन आले आहेत. त्यासोबतच रिक्षाला जमावाने घेरले आहे.

अविनाशच्या रिक्षात बसलेले दोन्ही प्रवासी मुन्नीपाल आणि सूरज यादव हे दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. या दोघांनी चोरलेल्या बॅटरीज ते रिक्षात ठेवत होते. त्यावेळी परिसरातील लोकांच्या लक्षात आले की, दोन जण बॅटरीज चोरत आहेत. त्यामुळे जमावाने या दोघांना मारहाण सुरु केली. मारहाणीपासून वाचण्यासाठी मुन्नीपाल आणि सूरजने जमावाला सांगितले की रिक्षा चालक अविनाश आमचाच सहकारी आहे. त्यामुळे जमावाने अविनाशला मारायला सुरुवात केली.

जमावाने अविनाशला विजेच्या खांबाला बांधून मारहाण केली. तसेच मारहाण करत असताना अविनाशच्या घरी फोन करुन त्याचे आई-वडील आणि बायकोला बोलावले. त्याचे आई-वडील आणि बायको घटनास्थळी आले तेव्हा अविनाशला लोक मारहाण करत होते. या मारहाणीत अविनाशचा मृत्यू झाला.

अविनाशची पत्नी कुसुम लता हिने अविनाशला मारहाण करणाऱ्या 5-6 लोकांना ओळखले आहे. परंतु दिल्ली पोलीस कारवाई करण्यात दिंरगाई करत असल्याचे कुसुम लता हिचे म्हणणे आहे. अद्याप बाकिच्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही.