रवींद्र कुमार, धर्म सिंह, निर्गम कुमार पांडे अशी या तिघांची नावं आहेत. हे तिघे नागपुरातून हा गोरखधंदा करत होते. त्यात त्यांना लष्करातील काही जवान आणि निवृत्त अधिकाऱ्यांची मदत होत असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. लवकरच या तिघांना अटक करण्यात येईल.
पेपर फुटीची सुरुवात
रवींद्र कुमार, धर्म सिंह, निर्गम कुमार पांडे हे तिघेही खाजगी क्लासेसला मदत करायचे. रवींद्र कुमार काही दिवसांपूर्वी परीक्षेला आलेल्या काही मुलांना भेटला. त्याने मुलांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि मुलांनी ही माहिती सातारा जिल्ह्यातील फलटणमधील छत्रपती शिवाजी महाराज मिलिटरी अॅकॅडमी चालवणाऱ्या अाप्पा जाधव आणि संतोष शिंदे यांना दिली. इथूनच या गोरखधंद्याची सुरुवात झाली.
दिल्लीत पेपर तयार झाल्यानंतर ते सीडीने विविध केंद्रांवर पाठवले जात होते. हे तिन्हीही क्लर्क पेपरची सीडी आपल्या कंप्युटरमध्ये टाकल्यानंतर ती परीक्षेच्या एक दिवस अगोदर व्हॉट्सअॅपद्वारे मुलांना पाठवत होते. त्यामुळे ठाणे पोलिसांनी आता या पेपरने पास झालेल्या विद्यार्थ्यांचाही शोध घेणं सुरु केलं आहे. शिवाय यातून झालेल्या कमाईचाही आढावा घेतला जात आहे.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही सर्व माहिती लष्कराला दिली असून तिन क्लर्कला लवकरच अटक केली जाणार आहे. शिवाय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याचीही माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
सैन्यभरतीचा पेपर फुटल्याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने देशभरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 21 आरोपींसह शेकडो विद्यार्थ्यांना अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींमध्ये सैन्याशी निगडीत काही जणांचा समावेश आहे.
रविवारी नियोजित असलेल्या सैन्यभरतीचे पेपर आधीच फुटल्याने देशभरात अटकसत्र सुरु झालं. पहाटे ठाणे क्राईम ब्रांचने नागपूर, पुणे आणि गोव्यातून अनेक विद्यार्थी आणि दलालांना अटक केली आहे.
नागपूरच्या पार्वती नगर येथील मौर्य सभागृहातून पहाटे 4 वाजताच्या सुमारास ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकानं आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर पुण्याच्या हडपसरमधून दोन जणांना अटक केली. या दोघांनी 70 जणांना प्रत्येकी तीन लाख रुपयांत पेपर वाटल्याची माहिती आहे.
ठाणे पोलिसांची याप्रकरणी चौकशी चालून असून ठिकठिकाणी धाडसत्र सुरु आहे.