बर्थडे सेलिब्रेशनसाठी जाणाऱ्या 3 डॉक्टरांचा अपघातात मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 19 Mar 2018 01:28 PM (IST)
हर्षवर्धन वानखेडे नामक व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर जात होते. हर्षवर्धन हे सुद्धा अपघातग्रस्त इनोव्हा गाडीत होते, त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला.
लखनौ : वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणाऱ्या ‘एम्स’च्या तीन डॉक्टरांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला, तर चार डॉक्टर जखमी झाले आहेत. मथुरा जिल्ह्यातील कैती गावाजवळ हा अपघात झाला. हर्षवर्धन वानखेडे नामक व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर जात होते. हर्षवर्धन हे सुद्धा अपघातग्रस्त इनोव्हा गाडीत होते, त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. डॉ. यशप्रीत सिंह आणि डॉ. हिम्बाला या डॉक्टरांचाही मृतांमध्ये समावेश आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी एम्समधील काही डॉक्टर टोयोटा इनोव्हाने आग्र्याला जात होते. त्यावेळी मिनी ट्रकने धडक दिली आणि 300 मीटरपर्यंत इनोव्हाला ट्रकने फरफटवत नेले. जखमी डॉक्टरांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी अर्ध्या तासाचा अवधी गेला. जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, तर मृत डॉक्टरांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले.