Indian Students: चीनच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कोविड-19 साथीच्या आजारामुळे व्हिसा आणि उड्डाण निर्बंधांनंतर सुमारे दोन वर्षांपासून भारतात असलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा आपल्या देशात शिक्षणासाठी येण्याची परवानगी देण्याची घोषणा चीनने शुक्रवारी केली. याबाबत माहिती देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले आहेत की, 'आमचा देश अभ्यासासाठी चीनमध्ये परतण्याबद्दल चिंतीत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना अधिक महत्त्व देतो. 


झाओ लिजियान म्हणाले, चीनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या परतीचे काम सुरू झाले आहे. भारताला फक्त अशाच विद्यार्थ्यांची यादी द्यावी लागेल ज्यांना खरोखरच चीनमध्ये परत यायचे आहे. तत्पूर्वी आधीच्या अहवालानुसार, 23,000 हून अधिक भारतीय विद्यार्थी, ज्यापैकी बहुतेक चिनी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत, घरी परतल्यानंतर भारतात अडकले आहेत. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर हे विद्यार्थी डिसेंबर 2019 मध्ये भारतात परतले होते. चीन सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे ते चीनला परत जाऊ शकले नाही. भारतीय विद्यार्थ्यांनी पुन्हा चीनमध्ये परतण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु बीजिंगने भारतीयांसाठी सर्व उड्डाणे आणि व्हिसा रद्द केल्यामुळे त्यांना ऑनलाइन वर्ग घ्यावे लागले.


चीनने भारताचा व्हिसा आणि फ्लाइट रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांव्यतिरिक्त चीनमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची शेकडो कुटुंबेही मायदेशी परतली होती. झाओ म्हणाले की, मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी चीनमध्ये शिकत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांच्या परतीच्या कालावधी बद्दल विचारले असता, झाओ म्हणाले की, भारतातील चिनी दूतावास आणि विद्यमान चॅनेल विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काम करतील. भारतीय दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, 25 मार्च 2022 रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि चायनाचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भेटीनंतर, चिनी बाजूने विद्यार्थ्यांच्या परतीची सोय करण्याबाबत विचार करण्याची तयारी दर्शवली होती.


महत्त्वाच्या बातम्या :