नवी दिल्ली : देशातील हजारो एनजीओ अर्थात स्वयंसेवी संस्थांवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मुदतीत नूतनीकरणाचे अर्ज न भरल्याने अनेक सरकारी तसंच बिगर सरकारी संस्थांच्या परदेशी देणग्या रोखण्यात आल्या आहेत.
आयआयटी, एसएनडीटी, रामकृष्ण मिशन, रोटरी क्लब, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचाही यामध्ये समावेश आहे. याशिवाय वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकची संस्थाही या कारवाईच्या कक्षेत आली आहे. यामुळे पुढील पाच वर्षांसाठी या एनजीओंना परदेशी देणग्या स्वीकारता येणार नाहीत.
परकीय देणग्यांची वार्षिक विवरणपत्रे तीन वर्षांपासून सादर न करणाऱ्या राज्यातील एक हजारांहून अधिक स्वयंसेवी संस्थांची नोंदणी गृहमंत्रालयाने मागील वर्षी रद्द केली होती. तरीही या संस्थांनी परवाना नूतनीकरणात टाळाटाळ केली. त्यामुळे गृहमंत्रालयाने देशातील 11 हजार 319 संस्थांचे परवाने 31 ऑक्टोबर रोजी रद्द केले होते. शिवाय 1736 संस्थांना मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही संस्थांनी निष्काळजीपणा दाखवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.