PM modi On Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे. पाच ऑगस्ट रोजी काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. पाच ऑगस्ट रोजी काँग्रेसनं काळी कपडे घालून आंदोलन केले होते, यावरुनच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांनी निशाणा साधलाय. ते म्हणाले की, 'आपल्या देशात असे काही लोक आहेत, जे नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत, निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. सरकारविरुद्ध खोटे बोलूनही जनता अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. त्याच नैराश्यातून हे लोक आता काळ्या जादूकडे (Black Magic) वळाले आहेत.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काळ्या कपड्यातील फोटो पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'अमृत महोत्सवादरम्यान संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात रंगला असताना, जे काही घडले आहे त्याकडे मी देशाचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. या पवित्र सोहळ्याला बदनाम करण्याचा, आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा लोकांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या देशातही असे काही लोक आहेत जे नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत, निराशेच्या गर्तेत बुडालेले आहेत. सरकारच्या विरोधात खोटे बोलूनही जनता अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. अशा नैराश्यात, हे लोक काळ्या जादूकडे वळतानाही दिसत आहेत.'  काळ्या जादूची मानसिकता पसरवण्याचा प्रयत्न होत असतानाच्या  5 ऑगस्टच्या घटनांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. ज्यांना असे वाटते की काळे कपडे परिधान केल्याने निराशेचा काळ संपेल, पण त्यांना हे माहित नाही की काळ्या जादूवर  आणि अंधश्रद्धेवर  त्यांचा विश्वास असला तरी जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास कधीच परत येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 


जयराम रमेश यांचं प्रत्युत्तर-
काँग्रस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेय. जयराम रमेश यांनी ट्वीट करत आपली बाजू मांडत भाजपवर हल्लाबोल केलाय. जयराम रमेश म्हणाले की, 'काळा पैसा आणण्यासाठी काही करु शकले नाहीत. आता काळ्या कपड्यावरुन विनाकारण मुद्दा करत आहेत. देशातील लोकांना पंतप्रधानांनी काळ्या पैसावर बोलावं असे वाटतेय पण ते काहीच बोलत नाहीत.' जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काळ्या कपड्यातील फोटोही पोस्ट केला आहे.  






 काँग्रेसचं काळी कपडे परिधान करुन आंदोलन - 
5 ऑगस्ट रोजी काँग्रेसने महागाईविरोधात आंदोलन पुकारलं होतं. यावेळी काँग्रेस नेत्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी काळी कपडे घालत निषेध नोंदवला होता.