नवी दिल्लीः मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी भारताचे गृह सचिव आणि गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानातील हिल स्टेशनचा आनंद घेत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.


 

या समोर आलेल्या माहितीमुळे 26/11 प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं आहे. शासकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाच दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.

 

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाला हल्ला

भारताचे तत्कालीन गृह सचिव मधुकर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर 2008 साली इस्लामाबाद येथे भारताची एक समिती चर्चेसाठी गेली होती. या समितीमध्ये आयबीसह परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव दर्जाचे अनेक अधिकारी होते.

 

गृह सचिव स्तरावरील ही चर्चा 25 नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर ही समिती पाकिस्तानमध्ये थांबली होती. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी ही समिती पाकिस्तानातील मरी या हिल स्टेशनवर पाहुणचार घेत होती, अशी माहिती समोर आली आहे.

 

पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना लालुच दाखवली, ज्यामध्ये अधिकारी फसले. त्यामुळेच हा हल्ला झाला, असा गंभीर आरोप लावण्यात आला आहे.

 

मात्र मधुकर गुप्ता यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 

मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात 169 जणांचा मृत्यू झाला होता. तर 309 लोक जखमी झाले होते. दरम्यान या समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर हल्ल्याच्या तपासाला नवीन वळण मिळण्याची चिन्ह आहेत.