मुंबई : तिसरी आघाडी अस्तित्वात येणं शक्य नसल्याचे मला व्यक्तिगत वाटते आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. मात्र, आपल्या सहकारी नेत्यांना अशा पर्यायी गटाची स्थापना व्हावी, असे वाटत असल्याचेही पवारांनी नमूद केले.

सध्या 1977 सारखी स्थिती आहे. त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. आणीबाणीनंतर असा कोणताही पक्ष नव्हता, ज्याची संपूर्ण देशावर पकड होती. मात्र काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांनी काँग्रेसला पराभूत केलं. ज्यांनी इंदिरा गांधींना पराभूत केलं, त्यांनीच जनता पार्टी स्थापन केली, असे म्हणत पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, “मोरारजी देसाईंना नेते म्हणून निवडले गेले. मात्र मोरारजी देसाई हे काही पर्याय म्हणून पुढे आणले गेले नव्हते. त्यामुळे शरद पवार किंवा इतर कुणाला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रश्नच नाही. शिवाय प्रामाणिकपणे सांगायचं तर महाआघाडी किंवा तिसरी आघाडी सध्याच्या स्थितीत अशक्य दिसते आहे.”

“जिथवर माझा अभ्यास आहे, त्यानुसार मला वाटतं की, महाआघाडी व्यावहारिकदृष्ट्या शक्य वाटत नाही किंवा ती सत्यात उतरेल असेही वाटत नाही. मात्र माझे अनेक सहकारी विद्यमान सरकारला पराभूत करण्यासाठी महाआघाडीचा विचार करत आहेत. मात्र ते शक्य वाटत नाही.” असेही पवारांनी या मुलाखतीत मत मांडले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तिसऱ्या आघाडीवर केलेल्या वक्तव्यानंतर आज दिल्लीतील काँग्रेसची सूत्र हलली. तिसरी आघाडी अस्तित्वात येणं शक्य नाही असं काल एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत पवारांनी म्हटलं. त्यानंतर दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली.

महाराष्ट्र काँग्रेसचं प्रभारीपद स्वीकारल्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंनी बोलावलेल्या या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. पवारांनी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर येत्या काळात सरकारविरोधात एकजूट होण्यावर याबैठकीत चर्चा झाल्याचं समजतं आहे. आता या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार का हे पाहणं महत्वाचं आहे.