Mumbai - Goa Express:  सुट्टीच्या दिवसांमध्ये गोव्याला (Goa) जाण्याचं प्लॅनिंग सगळेच जण प्रामुख्याने करतात. अगदी महिनाभर आधी म्हटलं तरी गोव्याला जाण्याची तयारी सुरु असते. पण गोव्याला कसं जायचं या प्रश्नामध्ये जवळपास प्लॅनिंगचा अर्धा वेळ जातो. हल्ली गोव्याला जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फ्लाईट, ट्रेन, बस किंवा काही जण खासगी वाहनाने देखील प्रवास करतात. पण यामधील ट्रेनच्या प्रवासाला जास्त पसंती मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतात रेल्वेचं मोठं जाळं पसरलेलं आहे. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीय रेल्वेने प्रवास करता येतो. 


गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य जरी असलं तरी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची आहे. तरुण वर्गाचा यामध्ये खासकरुन समावेश होतो. पण आता गोव्याला जाण्यासाठी रेल्वेचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. तसेच कोकणात जाणारे चाकरमानी देखील गोव्यापर्यंत जाणाऱ्या रेल्वेनेच प्रवास करतात. त्यामुळे चाकरमान्यांसाठी हा अत्यंत सोयीस्कर प्रवास असतो. 


गोव्याला जाणाऱ्या काही प्रमुख गाड्या 


नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ते मडगांव (गोवा) या मार्गावरील वंदे भारत (Vande bharat express) रेल्वेचं उद्घाटन केलं आहे. त्यामुळे आता मुंबईहून गोव्याला फक्त आठ तासांमध्ये पोहचता येणार आहे. दरम्यान वंदे भारत शिवाय जनशताब्दी, मांडोवी, कोकणकन्या, तेजस या देखील एक्सप्रेस आहेत. यामधून तुम्ही गोव्यापर्यंतचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये करु शकता. 


जनशताब्दी एक्सप्रेस (Janshatabdi Express)
ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगांवपर्यंत धावते. ही गाडी आठ तास चाळीस मिनिटांमध्ये मुंबई ते गोवा हे अंतर पूर्ण करते. तर  दादर , ठाणे , पनवेल , चिपळूण , रत्नागिरी , कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम ते मडगाव जंक्शन या मार्गावरुन ही रेल्वे धावते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील यामधून प्रवास करता येतो. 


मांडोवी एक्सप्रेस (Mandovi Express)
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगांव असा प्रवास ही मांडोवी एक्सप्रेस करते. तर गोव्यापर्यंत पोहचायला या एक्सप्रेसला 11 तास 35 मिनिटे लागतात. तर ही एक्सप्रेस कोकणातील चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबते. 


कोकणकन्या एक्सप्रेस (Kokankanya Express)
संपूर्ण कोकणवासीयांसाठी आवडीची असलेली कोकण कन्या ही एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगांव पर्यंत धावते. या गाडीला 767 किमी अंतराचा प्रवास करण्यासाठी एकूण 13 तास 25 मिनिटे लागतात. माणगावं , चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड, वैभववाडी रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ,सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबते.


तेजस एक्सप्रेस (Tejas Express)
वंदे भारत आणि जनशताब्दी एक्सप्रेस नंतर तेजस एक्सप्रेस ही सर्वात वेगवान धावणारी एक्सप्रेस आहे. ही एक्सप्रेस  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमाली असा प्रवास करते. ही एक्सप्रेस मुंबई ते गोवा हे अंतर आठ तास 30 मिनिटांत पूर्ण करते. तर ही गाडी कोकणातील चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ आणि करमाळी या स्थानकांवर थांबते. 


कोणत्या गाडीने होईल सर्वात स्वस्त प्रवास ?


यामध्ये सर्वात स्वस्त प्रवास हा जनशताब्दी एक्सप्रेस मधून करता येतो. जनशताब्दी एक्सप्रेसचे तिकीट दर हे 240 रुपये ते 945 रुपये आहेत. पण जर तुम्हाला जनशताब्दी या एक्सप्रेसच्या विस्ताडोम या कोचने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला 2495 रुपये इतके तिकीट दर आहेत. त्यानंतर मांडोवी एक्सप्रेसचा नंबर येतो. मांडोवी या रेल्वेचे किमान तिकीट दर हे 325 रुपयांपासून सुरु होतात. तर या रेल्वेचे सर्वात महाग तिकीट हे 2,640 रुपयांना आहे. यानंतर प्रवासासाठी स्वस्त ही कोकणकन्या आहे. कोकणकन्येचे किमान तिकीट हे 355 रुपयांपासून सुरु होते. तर 2425 रुपये हे या गाडीचे सर्वात महागडे तिकीट आहे.  या प्रवसातली आतापर्यंतचे सर्वात महाग तिकीट दर हे तेजस एक्सप्रेसचे होते. तेजस एक्सप्रेसचे किमान तिकीट दर हे 1034 रुपये आहेत तर 2322 रुपये इतके या रेल्वेचे सर्वात जास्त तिकीट दर आहेत.  पंरतु आता वंदे एक्सप्रेस हा या मार्गावरील सर्वात महाग प्रवास आहे. 


 कोणता प्रवास अधिक वेगवान ?


आतापर्यंत तेजस एक्सप्रेस ही सर्वात जास्त वेगवाग प्रवास करत होती. तेजस ही जवळपास आठ तास 30 मिनिटांत गोव्यापर्यंतचे अंतर पूर्ण करते. तर जनशताब्दी एक्सप्रेस ही 8 तास 40 मिनिटांत मुंबई ते गोवा प्रवास करते. मांडोवी एक्सप्रेसला गोव्यापर्यंत पोहचायला 11 तास 35 मिनिटे इतका कालावधी लागतो. कोकणकन्या ही सर्वात जास्त काळ प्रवास करते. कोकणकन्येने गोव्याला जाण्यास जवळपास 13 तास 25 मिनिटे इतका कालावधी लागतो. पण आता वंदे भारत एक्सप्रेसमुळे तुम्ही केवळ आठ तासांमध्येच तुम्हाला गोव्यापर्यंत पोहचवते. 


त्यामुळे आता तुम्हाला आरामदायी आणि स्वस्तात प्रवास करायचा असेल तर तुम्ही या ट्रेनप्रवासांचा नक्कीच विचार करु शकता. पण जर तुम्हाला अगदी काही तासांमध्ये गोव्याला पोहचायचे असेल तर तुम्हाला विमानाचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mumbai-Madgaon (Goa) Vande Bharat Express : मुंबईहून गोवा आता फक्त आठ तासांवर! कुठे-कुठे थांबणार वंदे भारत? तिकिट किती? जाणून घ्या एका क्लिकवर