नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांनी माहिती अधिकाराअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया मॅनेजमेंटवर किती खर्च होतो, याची माहिती मागवली. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी सोशल मीडियावर किती खर्च केला, याची माहिती मागवण्यासाठी सिसोदियांनी अर्ज केला होता.
पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडियावर आतापर्यंत एक रुपयाही खर्च आलेला नाही, असं उत्तर पंतप्रधान कार्यालय म्हणजेच पीएमओने दिलं आहे.
पंतप्रधानांचं 'पीएमओ इंडिया' हे मोबाईल अॅप एका स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी विकसीत केलं आहे. त्यामुळे या अॅपवर विद्यार्थ्यांच्या सत्काराला जे पैसे लागले, त्याव्यतिरिक्त कोणताही खर्च आला नाही, असं पीएमओने म्हटलं आहे.
पीएमओ अॅप पीएमओ कार्यालयाकडून ऑपरेट केलं जातं. त्यामुळे वेगळ्या यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाचीही आवश्यकता नाही. शिवाय www.pmindia.gov.in ही पंतप्रधान कार्यालयाची वेबसाईटही पीएमओकडूनच ऑपरेट केली जाते, यावरही खर्च येत नाही, असं पीएमओने म्हटलं आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या सोशल मीडियाचं व्यवस्थापनही पीएमओकडूनच केलं जातं. त्यामुळे यासाठीही कोणता वेगळा खर्च येत नाही. शिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींकडून कोणतंही अभियान चालवण्यात आलं नाही, असंही पीएमओने उत्तरात म्हटलं आहे.