नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या यादवीत मुलायम सिंह यांची लहान सून अपर्णाने एन्ट्री घेतल्याने वेगळे वळण मिळाले आहे. आखिलेश यादव यांचा सावत्र भाऊ प्रतीक यादवची पत्नी अपर्णाच्या एन्ट्रीने दोन सुनांमध्ये राजकीय वर्चस्वाची चढाओढ पाहायला मिळत आहे.


मुलायम सिंह यादव यांनी डिसेंबरमध्ये समाजवादी पक्षाची यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी आपली दुसरी पत्नी साधना गुप्ताचा लहान मुलगा प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णाला लखनऊ कॅटमधून समाजवादी पक्षाचा उमेदवारी दिली. अपर्णाची उमेदवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना चांगलीच झोंबली. कारण मुलायम सिंहांचा दुसरा मुलगा प्रतीक शिवपाल यादवांच्या गोटातील असल्याने, मुलायम यांनी अखिलेश यादव यांना धोबीपछाड दिला होता. अपर्णाला उमेदवारी मिळाल्यापासू तिनेही सोशल मीडियावर विविध विषयांवरुन आपली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, आखिलेश यादव यांनी साधना गुप्तांच्या कुटुंबियांची राजकारणातील प्रवेशाला सातत्याने विरोध केला. यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतीक यादव यांची राजकीय कारकीर्द सुरु होण्यापूर्वीच आखिलेश यांनी खोडा घालून थांबवली. यानंतर अखिलेश यांनी मुख्यमंत्री पदाचा खुबीने वापर करुन पक्षावरील पकड मजबूत बनवली, अन् त्यातूनच आपल्या वडिलांसमोरच उभा डाव मांडला.

अखिलेश यांच्या या धोबीपछा़डामुळे मुलायम सिंह यादव यांनीही आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली.  त्यांनी आखिलेश विरोधात निर्णय घेण्यास सुरुवात केली. यामुळे अखिलेश यांनी ही लढाई प्रतिष्ठेची बनवली. अखिलेश यांनी पक्षातील वजन वापरुन काका शिवपाल यादव यांना घरचा रस्ता धरायला लावला, अन् अमर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे मुलायम सिंह यांना निवडणुक आयोगाचे दार ठोठवावे लागले.

एकीकडे ही यादवी सुरु असताना, दुसरीकडे अपर्णाच्या एन्ट्रीने आणखीनच भर पडली. अपर्णाच्या एन्ट्रीने अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव यांच्यातही राजकीय वर्चस्वाची चढाओढ सुरु झाली. मुलायम सिंह यादव यांची मोठी सून आणि अखिलेशची पत्नी डिंपल यादव ही सध्या कनोजमधून खासदार आहे. तर दुसरी सून आणि प्रतीकची 20 वर्षीय पत्नी अपर्णाला राजकारणात प्रवेश करायचा आहे.

डिंपल ही कॉमर्स ग्रॅड्यूएट असून, ती एका माजी सैनिक अधिकाऱ्याची मुलगी आहे. तिचा सर्वाधिक वेळ हा राजकारणापेक्षा गावच्या कॉन्टेनमेटमध्येच जातो. राजकारणातही तिला रस नसल्याने पक्षाअंतर्गत त्यांना अनेकवेळा विरोध झाला. 2009 च्या निवडणुकीत तिला राजकारणात उतरवल्यानंतरही डिंपल पाच मिनीटापेक्षा जास्त वोलू शकत नव्हती. तर दुसरीकडे अपर्णा ही पेशाने गायिका असून, ती एका निवृत्त पत्रकाराची मुलगी आहे. लहानपणापासून वडिलांच्या सानिध्यात राहिल्याने तिच्या राजकीय महत्त्वकांक्षा प्रचंड वाढल्या आहेत. शिवाय विविध कार्यक्रमातून तिने वेळोवेळी आपल्या विरोधकांचा समाचार घेत आपली राजकारणातील महत्त्वकांक्षा अधोरेखित केली आहे. तिच्या लग्नावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. तर गेल्या ऑक्टोबर महिन्यात एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी तिच्या राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील वाद विकोपाला गेल्यापासून अखिलेश यादवच्या पत्नी डिंपल यादव या अखिलेशच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत. अखिलेशच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या अखिलेश यांच्या सावलीप्रमाणे वावरत आहेत. तर दुसरीकडे अपर्णा यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून विविध व्यासपीठावरुन आपली महत्त्वकांक्षा व्यक्त करत आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या या यादवीत या दोन्ही सुनाही एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. आता यात कुणाची सरशी होणार हे उत्तर प्रदेशच्या निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.