हैदराबाद: हैदराबादच्या न्यायाधीशांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. हैदराबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांचा राजीनामा नामंजूर करत, त्यांनी मागितलेली 15 दिवसांची सुट्टीही रद्द केली.

इतकंच नाही तर त्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

निकालानंतर तातडीने राजीनामा

न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी सोमवारी हैदराबादेतील मक्का मस्जिद खटल्यातील आरोपी असीमानंद यांच्यासह सर्वांना निर्दोष ठरवलं होतं. त्यानंतर काही तासातच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या या राजीनाम्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.

रवींद्र रेड्डी यांनी वैयक्तिक कारण देत राजीनामा दिला होता. त्याआधी त्यांनी 11 वर्ष जुना मक्का मस्जिद स्फोटप्रकरणी स्वामी असीमानंदसह 5 जणांना निर्दोष ठरवलं होतं. त्यामुळे रेड्डी यांच्यावर निकालासाठी दबाव होता का, त्या दबावातूनच त्यांनी राजीनामा दिला का, असे प्रश्न विचारले जात होते.

न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचे आरोप
न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांची  न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली हायकोर्टाच्या दक्षता विभागाकडून चौकशी सुरु आहे.

न्यायाधीश रेड्डी यांच्याविरोधात कृष्णा रेड्डी नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. कृष्णा यांनी न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, त्यांच्यावर 12 डिसेंबर 2017 रोजी हायकोर्टात तक्रार दाखल केली.

न्यायाधीश रेड्डी यांनी टी पी रेड्डी नावाच्या आरोपीला पैसे घेऊन जामीन दिल्याचा आरोप, कृष्णा रेड्डी यांनी केला आहे.

हैदराबाद स्फोट

18 मे 2007 रोजी हैदराबादमधल्या मक्का मशिदमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर 58 जण जखमी झाले होते. स्थानिक पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर 2011 मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला. एनआयएला पुरावे गोळा करण्यात अपयश आल्याचं कारण देत असीमानंद यांची सुटका करण्यात आली.

संबंधित बातम्या

राजीनामा दिलेल्या न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप