नवी दिल्ली: केंद्रीय परिवहन मंत्रालयाने रिक्षा, टॅक्सी आणि ई रिक्षाचालकांना मोठा दिलासा दिला आहे. रिक्षा, टॅक्सी आणि ई रिक्षाचालकांसाठी आता व्यावसायिक परवाना अर्थात कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स बंधनकारक नसेल.


यापुढे केवळ हलक्या वाहनांचा परवाना अर्थात लाईट मोटर व्हेईकल लायसन्स असेल, तरीही रिक्षा, टॅक्सी आणि ई रिक्षा चालवण्याची परवानगी मिळेल.

मात्र ट्रक, बस किंवा अन्य अवजड वाहनांसाठी त्या त्या नियमानुसारच परवाने घ्यावे लागतील.

परिवहन मंत्रालयाने दिल्लीसह सर्व राज्यांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार ज्या वाहनांचं वजन 7,500 किलोपेक्षा कमी असेल, त्यांना कमर्शियल लायसन्सची गरज नाही.

सुप्रीम कोर्टाने 2007 मध्ये दिलेल्या अध्यादेशाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. गाडीचा विमा वाहनाच्या श्रेणीनुसार असतो, त्याचा परवान्याशी संबंध नसतो, असं सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात म्हटलं होतं.

परिवहन मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या मते, “सरकारच्या नव्या निर्णयामुळे, कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेत होणारा भ्रष्टाचार बंद होईल”