नवी दिल्ली : देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याकडे कुमार यांनी शुक्रवारी आपला राजीनामा सुपूर्द केला. वैयक्तीक कारणांमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सॉलिसिटर जनरल हे पद न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित देशातील दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे.

मोदी सरकारने कुमार यांची 2014 मध्ये सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केली होती. या पदावर त्यांचा हा दुसरा कार्यकाळ होता. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये गुजरात सरकारच्या वतीने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियम शीर्ष कमिटीसाठी न्यायमूर्ती म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती.

काय आहे कोलेजियम व्यवस्था?

कोलेजियम म्हणजे पाच जणांचा समूह असतो. या पाच व्यक्तींमध्ये देशाचे मुख्य न्यायमूर्ती आणि सुप्रीम कोर्टाचे चार वरिष्ठ न्यायमूर्ती असतात. कोलेजियममध्ये न्यायमूर्तींच्या नियुक्तीची थेट तरतूद नाही. पण सुप्रीम कोर्टाचे पाच वरिष्ठ न्यायमूर्तींची ही (कोलेजियम) समिती न्यायमूर्तींची नियुक्ती आणि त्यांची बदलीचा निर्णय घेते. कोलेजियमच्या शिफारसी मान्य करणं सरकारसाठी बंधनकारक असतं. ही व्यवस्था 1993 पासून आमलात आहे.

दुसरीकडे, काही महिन्यांपूर्वीच देशाचे मुख्य महाधिकवक्ता मुकुल रोहतगी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच महाधिवक्तापदाच्या दुसऱ्या कार्यकाळाची जबाबदारी आपल्याला सोपवू नये, अशी रोहतगी यांनी सरकारला पत्र लिहून इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर जेष्ठ अधिवक्ता के.के.वेणूगोपाल यांची महाधिवक्ता पदावर नियुक्ती केली गेली.

आता सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सहकार्यांना लिहिलेल्या संदेशात, मी माझ्या वैयक्तीक कारणांमुळे पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.