नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि कर्जबुडव्या विजय मल्ल्या यांच्या भेटीनंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

या पत्रकार परिषदेला राहुल गांधींसह पी एल पुनिया हे उपस्थित होते. पुनिया यांनी स्वत: जेटली आणि विजय मल्ल्या यांची भेट झाल्याचं पाहिलं होतं असा दावा केला. 1 मार्च 2016 रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जेटली-मल्ल्या यांची भेट झाली होती, असं पुनिया यांनी सांगितलं. त्यासाठी त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज तपासा असंही ते म्हणाले.

1 मार्चला या दोघांची भेट झाली त्यानंतर दोन मार्चला मल्ल्या पळून गेला, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले, “अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांच्या भेटीत काही ना काही डील निश्चितच झाली आहे. त्याची माहिती अर्थमंत्र्यांनी द्यायलाच हवी. त्यांनी राजीनामा द्यावा”

अर्थमंत्री जेटलींनी पळपुट्या मल्ल्यासोबत 15-20 मिनिटे चर्चा केली. सरकारमध्ये पंतप्रधान सर्व काही ठरवतात. त्यामुळे पंतप्रधानांनीच विजय मल्ल्यासोबत डील करण्यास सांगितलं होतं का त्याबाबतचा खुलासा जेटलींनी करावा, असं राहुल गांधी म्हणाले.

भारत सोडण्यापूर्वी जेटलींना भेटलो - मल्ल्या

देश सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटलींसमोर सेटलमेंटसाठी प्रस्ताव ठेवला होता, असा खळबळजनक दावा कर्जबुडव्या विजय मल्ल्या याने केला आहे. तसेच, लंडनला जाण्यापूर्वी जेटलींना मी भेटलोही होतो, असंही मल्ल्या म्हणाला.

भारतातील बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून, 2 मार्च 2016 रोजी विजय मल्ल्या भारताबाहेर फरार झाला. त्यानंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे मागणी केली. त्याबाबत लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी मल्ल्याने हा गौप्यस्फोट केला.

अरुण जेटलींचं स्पष्टीकरण

कर्जबुडव्या विजय मल्ल्याने देश सोडण्याआधी अर्थमंत्री जेटलींना भेटल्याचे सांगितल्यानंतर, तातडीने अर्थमंत्री अरुण जेटलींनी पत्रक काढून स्पष्टीकरण दिले.

जेटली म्हणाले, "मला भेटून सेटलमेंटची ऑफर दिली, हे विजय मल्ल्या यांचे विधान पूर्णपणे चुकीचं असून, सत्य दर्शवत नाही. 2014 पासून विजय मल्ल्या यांना भेटण्याची वेळ दिली नाही. त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."

राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पाहण्यासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या 

देश सोडण्याआधी सेटलमेंटसाठी जेटलींना भेटलो होतो : मल्ल्या