Telangana tunnel accident : श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल (SLBC) बोगद्याचा एक भाग नागरकुर्नूल, तेलंगणा येथे 22 फेब्रुवारी रोजी कोसळला होता. घटनेला 6 दिवस उलटून गेले आहेत. मात्र बोगद्यात अडकलेल्या 8 मजुरांची अद्याप सुटका झालेली नाही. बचावकार्य सुरू आहे. आज शुक्रवारी दक्षिण मध्य रेल्वेचे (SCR) दोन पथकेही बचावकार्यासाठी पोहोचले. प्लाझ्मा कटर आणि ब्रॉक कटिंग मशिन यांसारख्या आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने टीम कटिंग मार्गातून जड धातू काढत आहे.

Continues below advertisement


कोणताही मजूर जिवंत सापडण्याची शक्यता फारच कमी 


नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे (एनजीआरआय) शास्त्रज्ञही घटनास्थळी पोहोचले आहेत. ग्राउंड पेनिट्रेटिंग रडारच्या (जीपीआर) मदतीने ते ढिगाऱ्याखाली दबलेल्या कामगारांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. TOI च्या अहवालानुसार, कोणताही मजूर जिवंत सापडण्याची शक्यता फारच कमी आहे. नागरकुर्नूलचे एसपी वैभव गायकवाड यांनी सांगितले की, मलबा हटवण्याचे आणि लोखंडी रॉड कापण्याचे काम सातत्याने सुरू आहे.


600 कर्मचारी बचाव कार्यात सहभागी 


गुरूवारी सकाळपासून ढिगारा साफ करून बोगद्यातील पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजता एक पथक बोगद्यावर गेले. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ व्यतिरिक्त राज्य सरकारच्या इतर एजन्सीचे सुमारे 600 कर्मचारी बचाव कार्यात सहभागी आहेत. उत्तराखंडच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवणाऱ्या टीमचाही यात समावेश आहे.


टनेल बोरिंग मशीन (TBM) कापले जात आहे


बचाव कार्यात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गॅस कटिंग मशीन आत नेण्यात आल्या आहेत. रात्रीही टनेल बोअरिंग मशिन (टीबीएम) व इतर अडथळे कापून मार्गावरून दूर करण्यात आले. तेलंगणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी यांनी बुधवारी सांगितले की, बोगद्यात अडकलेला टीबीएम गॅस कटरने कापून काढला जाईल. यानंतर आर्मी, नेव्ही, रॅट मायनर्स आणि एनडीआरएफची टीम पुन्हा आठ जणांना वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.


घाबरलेल्या कामगारांनी काम सोडण्यास सुरुवात केली


अपघातानंतर बोगद्यात काम करणाऱ्या काही कामगारांनी भीतीपोटी काम सोडले आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल (SLBC) प्रकल्पात 800 लोक काम करत आहेत. यापैकी 300 स्थानिक आहेत आणि उर्वरित झारखंड, ओडिशा आणि उत्तर प्रदेशातील आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीला कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, कंपनीने त्यांच्यासाठी निवासी छावण्या बांधल्या आहेत. काही लोकांना परत जायचे आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या