नवी दिल्ली: ईव्हीएम घोळाच्या तक्रारी झाल्यानंतर आता नव्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सची खरेदी होणार आहे. त्यासाठी 3 हजार 174 कोटी रुपये केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केले आहेत. निवडणूक आयोगाच्या या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

या नव्या ईव्हीएममुळे मतदारांना मतदान केल्यानंतर पावती मिळणार आहे. त्यामुळं ईव्हीएम विषयीच्या शंका दूर होतील असा निवडणूक आयोगाचा दावा आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत या नव्या मशीन्सचा वापर होणार आहे.

लोकसभा निवडणुकीआधी व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएट) मशीन खरेदी करणे अत्यावश्यक असल्याचं  पत्र निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला लिहिलं होतं.

ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीएट मशीन असणे अनिवार्य आहे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार कायदा मंत्रालयाने व्हीव्हीपीएटची ऑर्डर मंजूर करावी अशी मागणी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी केली होती. अखेर केंद्रीय मंत्रिमंडळानं निवडणूक आयोगाची ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता मतदाराना बोटावरील शाईसोबत पावतीही मिळणार आहे.