Terrorists Attack in Manipur : मणिपूरमधील सूरज चंद जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आसाम रायफल्सचे कर्नल आणि त्यांचे कुटुंबीय शहीद झाले आहेत. एस सेहकेन गावाजवळ हा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी घात लावून हा हल्ला केला. या हल्ल्यात कर्नल विप्लव त्रिपाठी (सीओ-46 एआर) त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर, या हल्ल्यातील अन्य जखमींना बेहियांग प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.
या हल्ल्या दरम्यान तीन क्युआरटी सदस्यांचाही मृत्यू झाला. सुरक्षा दलाच्या ताफ्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले असल्याचे म्हटले जात आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ताफ्यात लष्करी अधिकाऱ्यांचे कुटुंबीयदेखील होते. दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याचा निषेध करताना त्यांनी हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्यात येईल. पॅरा मिलिट्री आणि राज्य सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यास सज्ज आहेत.
या हल्ल्यामागे मणिपूरमधील पीपल्स लिबरेशन आर्मीचा हात असल्याचे म्हटले जाते.