मुंबई : एटीएममधून दरदिवशी काढता येणाऱ्या रकमेची मुदत आजपासून दहा हजार रुपये करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात निर्णय घेतला आहे. मात्र बँकेतून आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.


यापूर्वी ही मर्यादा दिवसाला साडेचार हजार रुपये इतकी होती. नोटाबंदीचा निर्णय जाहीर करुन दोन महिने उलटून गेले आहेत. त्यानंतर ही मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. मात्र बँकेतून आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकेनं कायम ठेवली आहे.

चालू खात्यामधून रक्कम काढण्याची मर्यादा एक लाख इतकी करण्यात आली आहे. यापूर्वी ती 50 हजार होती. 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सरकारनं एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मर्यादा घातली होती. आता चलनकोंडी कमी झाल्यामुळे सरकारनं या मर्यादेत वाढ केली आहे.

सुरुवातीच्या काळात दिवसाला फक्त दोन हजार रुपयांची असलेली मर्यादा अडीच हजार आणि त्यानंतर साडेचार हजार रुपये करण्यात आली होती. मात्र आता रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवत मोठा दिलासा दिला आहे.