नवी दिल्ली : नोटाबंदीचा देशाच्या विकासावर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा करणाऱ्या मोदी सरकार आणि भाजप नेते सातत्याने करताना दिसतात. मात्र, या दाव्याला आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (IMF) जोरदार धक्का दिला आहे. नोटाबंदीचा भारताच्या विकास दरावर विपरीत परिणाम होणार असल्याचं भाकित आयएमएफने वर्तवलं आहे.

चालु आणि पुढील आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास 7.6 टक्क्यावरून घसरून 6.6 टक्के इतका असेल, असा अंदाज आयएमएफच्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक' या अहवालात वर्तवण्यात आला आहे. नोटाबंदीचा भारताच्या विकासदरावर परिणाम होणार असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालातही नमूद करण्यात आले आहे.

https://twitter.com/PTI_News/status/820994898048454656

आयाएफने यावेळी असाही अंदाज वर्तवला आहे की, 2016 या वर्षात अर्थव्यवस्थेची गती कमी झाली होती. मात्र, पुढील दोन वर्षात अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसण्याची आशा आहे. शिवाय, विकसनशील देशांच्या बाजारांमध्येही उत्साहाचं वातावरण असेल.

चालू आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी निराशाजनक आहे. मात्र, 2018 साली भारतीय अर्थव्यवस्था 7.7 टक्क्यांच्या अंदाजित वाढीचा दर गाठू शकते, असेही आयएमएफने आपल्या अहवालात म्हटलं आहे.