हैदराबाद: मुदतीपूर्वीच तेलंगणा विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. तेलंगणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.  तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीचं सरकार आहे. या सरकारचा कार्यकाळ 2 जून 2019 पर्यंत आहे. मात्र त्यापूर्वीच सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यामुळे तेलंगणात वेळेआधीच निवडणुका होण्याची शक्यता आहे. अधिक माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पत्रकार परिषद घेणार आहेत.

दरम्यान, तेलंगणात सहा महिन्यांच्या आत विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 2 जून 2019 पर्यंत होता. त्यामुळे तिथे लोकसभा निवडणुकीवेळीच विधानसभेच्या निवडणुका झाल्या असत्या. मात्र चंद्रशेखर राव यांनी त्यापूर्वीच म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसोबत तेलंगणाच्या निवडणुका व्हाव्यात अशी मागणी केली आहे. त्यासाठीच विद्यमान विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

 अनेक दिवसांपासून तयारी

चंद्रशेखर राव हे गेल्या अनेक दिवसांपासून या निर्णयाची तयारी करत होते. नुकतंच मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्यभरात मोठी रॅली काढली होती. तसंच राज्यातील अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. रॅलींच्या निमित्ताने त्यांनी निवडणुकांची चाचपणी केली होती.

तेलंगणा विधानसभेची सद्यस्थिती

नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणा विधानसभा सदस्यांची संख्या 119 इतकी आहे. यामध्ये सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) 90, काँग्रेस 13 आणि भाजपचे 5 आमदार आहेत.

भाजपची प्रतिक्रिया

भाजप प्रवक्ते जीवीएल नरसिंहा राव यांनी चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला. “मतदान घेण्याबाबतच्या निर्णयाचा अधिकार टीआरएसकडे आहे. मात्र मुदतीपूर्वी निवडणूक का घेत आहोत, हे त्यांना जनतेला सांगावं लागेल. काँग्रेससह सर्व विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेने भयभीत झाले आहेत”